वाशी बस टर्मिनस कामाचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले विहित कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्देश
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : वाशी सेक्टर ९ ए येथे अत्याधुनिक स्वरूपातील इंटिग्रेटेड बस टर्मिनस उभारण्याचे काम सुरू असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्याठिकाणी भेट देत कामाच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व काम विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे व इतर अधिकारी, वास्तुविशारद, कंत्राटदार उपस्थित होते.
सेक्टर ९ वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहासमोर असलेल्या वाशी बसडेपोच्या जागेत भव्यतम स्वरूपात इंटिग्रेटेड बस टर्मिनस कम कमर्शिअल कॉम्प्लेक्सची आकर्षक इमारत उभारली जात असून विविध परवानग्या प्राप्त झाल्यानंतर आता या कामाला गतिमानता आलेली आहे. एप्रिल २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्यादृष्टीने कालबध्द रितीने नियोजनपूर्वक काम करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
१०३७३ स्क्वेअर मीटर क्षेत्रफळामध्ये ही २१ मजली इमारत उभारण्यात येत असून या इमारतीला जोडूनच पाठीमागे तळमजल्यावर १३ बसस्टॉपची व्यवस्था असलेले बस टर्मिनस तसेच ४ मजली पार्कींग क्षेत्र आहे. याठिकाणी ५ इलेक्ट्रिकल चार्जींग पॉईंट्सचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. २१ मजली इमारतीमध्ये दुकानांकरिता जास्त उंचीच्या जागा तसेच विविध ऑफिसेससाठीही जागा उपलब्ध असणार आहेत. त्याठिकाणी रेस्टॉरंटसाठीही विशिष्ट जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही वास्तू उभारली जात असल्याने ती शहराचे आकर्षणकेंद्रही असणार आहे. त्यादृष्टीने वास्तुरचनेकडे विशेष लक्ष देण्यात आलेले असून यावरील जाहिरातीच्या माध्यमातूनही नवी मुंबई महानगरपालिकेस उत्पन्न मिळण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.
इमारतीच्या बांधकामाची पाहणी करताना आयुक्तांनी फ्लोअरींग स्टील वर्क तसेच सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामाची बारकाईने पाहणी केली. त्याचप्रमाणे मटेरिअल टेस्टींग लॅबरोटरीची पाहणी करीत वापरण्यात येणा-या साहित्याची व करण्यात येणा-या कामाची गुणवत्ता उत्तम राहील यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले. बस स्टॉपवरील शेडवर सोलार सिस्टीम लावल्यास वीज बचत होईल अशा सूचना आयुक्तांनी केल्या. कामे करताना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे सूचित करीत सुरक्षा साधनांचा अनिवार्य वापर करण्याचेही त्यांनी सूचित केले.
एनएमएमटी परिवहन उपक्रम सक्षमीकरणासाठी बस टर्मिनस कम कमर्शिअल कॉम्प्लेक्सची वास्तू अत्यंत महत्वाची असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशित करीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी कामाच्या गुणवत्तेकडेही विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या.