संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जलवाहतूक मार्ग लवकर सुरू व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन या जलवाहतूक मार्गांच्या कामांचा आढावा घेतला. शहराची वाढती लोकसंख्या व शहरातील वाहनांमुळे वाढलेली वाहतूक कोंडी तसेच वाहनांमुळे प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेता जलवाहतूक हा पर्याय असल्याने ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने ६ महानगरपालिकेला जोडणारा जलवाहतूक प्रकल्पाला केंद्र शासनाने कडून मंजुरी मिळवून दिली आहे. सदर प्रकल्प टप्प्यात घेणार असून पहिल्या टप्प्यात कोलशेत, भिवंडी काल्हेर, डोंबिवली, भाईंदर या ४ ठिकाणी जेट्टी बांधण्याचे काम सुरु होणार असून नुकताच ९८ कोटीच्या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून मान्यता मिळाली आहे. सदर काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत कार्यान्वित होत आहे. सदर काम सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या प्रशासकीय मंजुरीसाठी बंदरे गृह विभागाकडे सादर करण्यात आलेले आहे. तसेच सी आर झेड यांचे क्लिअरन्स प्राप्त होताच या वर्षाअखेरीस कामाला सुरुवात होणार आहे.
त्याचबरोबर नवीमुंबईत बेलापूर येथे उभारण्यात आलेल्या जेट्टीचेही १०० टक्के काम पूर्ण झालेले आहे. सदर जेट्टीसाठी केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून ७ कोटी ५० लाख व राज्य शासनाकडून प्रवाशांच्या सोयी सुविधेंसाठी ४ कोटी असे एकूण ११ कोटी ५० लाख रुपये खर्च करून जेट्टीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. तरी लवकरात लवकर जलवाहतुक सुरु करण्यासाठी प्रवाशी बोटीची व्यवस्था करावी असे खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांना सांगितले.