सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत महापालिका प्रभाग ९६ मध्ये रंगरंगोटी, स्वच्छता तसेच नागरी समस्या निवारण करण्याची मागणी प्रभाग ९६ च्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सर्वप्रथम १० ते ४० लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत देशामध्ये नवी मुंबई महापालिकेचा प्रथम क्रमांक आल्याबाबत आपले, आपल्या महापालिका अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आणि शहराच्या विकासासाठी, समस्या निवारणासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या माजी नगरसेवक-नगरसेविकांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. यावर्षी तुम्ही-आम्ही व समस्त नवी मुंबईकरांनी संघठीत होवून स्वच्छतेबाबत जागरूक राहून केवळ लोकसंख्येच्या निकषावरच नाही तर सर्वच बाबतीत देशामध्ये आपले नवी मुंबई शहर स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत प्रथम क्रमाकांवर येईल, यासाठी प्रयत्न करू या असे रूपाली भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत आहे. महापालिका प्रशासनाकडून शहरी भागासाठी प्रथम क्रमाकांचा स्वच्छतेसाठी पुरस्कारही या प्रभागाला मिळालेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंर्तगत अभियान राबविताना प्रथम प्रभाग ९६ मधील गटारांची तळापासून स्वच्छता करून चोरीला गेलेली अथवा तुटलेली झाकणे असतील तिथे नवीन झाकणे बसवावीत. मल:निस्सारण वाहिन्यांची डागडूजी करण्यात यावी. प्रभागातील मुख्य रस्त्यावरील तसेच अंतर्गत रस्त्यावरील सर्वच सिडको, खासगी तसेच इतर गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेविषयी तसेच आरोग्यविषयक सुभाषिते व प्रबोधनात्मक सुविचार टाकण्यात यावे. परिसरातील मैदानांचे सुशोभीकरण करून त्याचीही रंगरंगोटी करण्यात याव्यात. परिसरातील मार्केट, शाळा, रूग्णालये, सार्वजनिक जागा यांच्याही संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावरही समाजप्रबोधनात्मक सुभाषिते बसवण्याची मागणी रूपाली भगत यांनी केली आहे.
वॉटर एंट्री अंर्तगत बाहेरील रस्ते व अंर्तगत रस्ते ज्या ज्या ठिकाणी जलवाहिन्यांचा, सोसायटीतील नळांचा दर्शनी भाग असेल त्या त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात, जेणेकरून त्या ठिकाणीही बकालपणा येणार नाही व जलावहिन्याही सुरक्षित राहतील. प्रभाग स्वच्छतेसाठी आपणास जे जे सहकार्य लागेल, ते ते सहकार्य करण्यास आपण सदैव तयार आहोत. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत स्वच्छता अभियान, नागरी समस्यांचे निवारण, भिंतींची रंगरंगोटी, त्यावर सुभाषिते, गटारांची झाकणे आदी कामे मार्गी लावण्याची मागणी रूपाली भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
समाजसेवक गणेश भगत यांनी याच आशयाचे निवेदनपत्र स्वत: नेरूळ विभाग कार्यालयात जावून सादर केले आहे.