सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील शाळेमध्ये मुलाचा दाखला घेण्यासाठी गरीब महिलेकडून पाच हजार रूपये रक्कमेची मागणी करणाऱ्या संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची लेखी मागणी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्यामुळे मनपा आयुक्तांनी या प्रकरणाची पूर्ण शाहानिशा करूनच मुख्याध्यापकला व शिक्षकाला निलंबित केले आहे.
नेरूळ सेक्टर दोन येथील आम्रपाली सोसायटीतील रहीवाशी जयश्री बागडे यांचा तक्रार अर्ज आल्यावर कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा महापालिका शैक्षणिक क्षेत्रातील सावळागोंधळ व पालकांची होणारी लुट आणि त्यातील गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. जयश्री बागडे यांचा मुलगा मुकुंद बागडे शाळा सोडण्याचा दाखला आणण्यासाठी गेला असता त्याच्याकडे पैशाची मागणी केली. हा प्रकार रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेवून त्यांच्या निदर्शनास आणून दिला. आयुक्त बांगर यांनी समस्येचे गांभीर्य जाणून घेत तात्काळ चौकशी केली. मुख्याध्यापकच निलंबित झाल्याने महापालिका शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिका शाळांमध्ये होणारी लूट आता तरी थांबली जाईल अशी प्रतिक्रिया पालकवर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.