सौ. सुवर्णा खांडगेपाटील : संपादक : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२१” मध्ये नवी मुंबई शहराने १० ते ४० लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान संपादन केला आहे. त्याचप्रमाणे ‘सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज’ अभियानात नवी मुंबई देशातील ‘व्दितीय’ क्रमांकाचे मानांकीत शहर ठरले आहे. यासोबतच ‘कचरामुक्त शहर’ कॅटेगरीमध्ये नवी मुंबईने ‘फाईव्ह स्टार’ मानांकन पटकाविले असून ओडीएफ कॅटेगरीमध्ये ‘वॉटर प्लस’ हे सर्वोच्च मानांकन संपादन केले आहे.
यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ चे गुणांकन करताना केंद्र सरकारने ‘प्रेरक दौड सन्मान’ ही नवीन कॅटेगरी सर्वेक्षणामध्ये समाविष्ट केलेली असून त्या अंतर्गत स्वच्छताविषयक सर्वसमावेशक बाबींचे परीक्षण करून शहरांना त्यांच्या कामगिरीनुसार श्रेणी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये ९५ टक्केपेक्षा अधिक गुणांकन प्राप्त करणाऱ्या देशातील ५ शहरांना ‘प्रेरक दौड सन्मान’ या नवीन कॅटेगरीमधील सर्वोच्च ‘दिव्य (प्लॅटिनम) मानांकन प्रदान करण्यात आले असून हे सर्वोच्च मानांकन प्राप्त करणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे.
‘प्रेरक दौड सन्मान’ या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नवीन कॅटेगरीमध्ये कचरा वर्गीकरण, ओला कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया, शहरातून संकलित होणाऱ्या संपूर्ण ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया, सुक्या कचऱ्यावरील प्रक्रिया व पुनर्प्रक्रिया , बांधकाम व पाडकाम कचऱ्यावरील (सी अँड डी वेस्ट) प्रक्रिया, क्षेपणभूमीवर जाणाऱ्या उर्वरित कचऱ्याचे प्रमाण आणि सॅनिटेशन विषयक विविध कामे अशा स्वच्छताविषयक विविध विषयांनुरूप परीक्षण करण्यात आले व त्यामधील प्रत्येक विषयास गुणांकन करण्यात आले.
या कॅटेगरीमध्ये १५ टक्केपेक्षा अधिक गुणांकन प्राप्त करणाऱ्या शहरांना ‘आरोही (कॉपर)’, ३५ टक्केपेक्षा अधिक गुणांकन प्राप्त करणाऱ्या शहरांना ‘उदित (ब्राँझ)’, ५५ टक्केपेक्षा अधिक गुणांकन प्राप्त करणाऱ्या शहरांना ‘उज्ज्वल (सिल्व्हर)’, ७५ टक्केपेक्षा अधिक गुणांकन प्राप्त करणा-या शहरांना ‘अनुपम (गोल्ड)’ आणि ९५ टक्केपेक्षा अधिक गुणांकन प्राप्त करणाऱ्या शहरांना ‘दिव्य (प्लॅटिनम)’ मानांकन घोषित करण्यात आले आहे.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने ९५ टक्केपेक्षा अधिक गुण संपादन करीत ‘प्रेरक दौड सन्मान’ या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नवीन कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ‘दिव्य (प्लॅटिनम)’ मानांकन प्राप्त केलेले आहे.
आपले नवी मुंबई शहर नेहमी अग्रेसर रहावे याकरिता नवी मुंबईकर नागरिक अत्यंत जागरूक असून स्वच्छता कार्यात त्यांनी घेतलेल्या सक्रीय सहभागामुळे तसेच स्वच्छताकर्मींनी घेतलेल्या मेहनतीमुळेच स्वच्छ सर्वेक्षणातील हे राष्ट्रीय पुरस्कार, मानांकने महानगरपालिकेस प्राप्त होत आहे. त्यामध्ये ‘प्रेरक दौड सन्मान’ या नवीन कॅटेगरीतही नवी मुंबई शहर सर्वोच्च दिव्य (प्लॅटिनम) मानांकनाचे मानकरी ठरले ही प्रत्येक नवी मुंबईकरासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने यापुढील काळात स्वच्छतेचे मानांकन अधिक उंचाविण्यासाठी आपण सर्व मिळून अग्रेसर राहू या असे आवाहन केले आहे.