ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीसह महापालिका सतर्क
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
नवी मुंबई लाईव्ह न्यूज ब्युरो
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही बाजारपेठांमध्ये उपाययोजना करण्यासाठी बाजार समिती प्रशासन व नवी मुंबई महापालिका प्रशासन कमालीची सतर्क झाली आहे. महापालिका प्रशासन आपल्या पातळीवर एकीकडे उपाययोजना करण्यासाठी दुसरीकडे बाजार समिती आवारातील समस्या सोडविण्यासाठी पाचही मार्केटमधील संचालक व समिती सचिव मंगळवारी, दि. ७ डिसेंबर रोजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेणार आहेत.
बाजार समितीच्या कांदा बटाटा, भाजी, फळ या कृषीमालाच्या तीन बाजारपेठांसह किराणा दुकान मार्केट व धान्य मार्केटचाही समावेश होत आहे. बाजार समिती कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, खरेदीदार, किरकोळ विक्रेते, वाहतुकदार, स्थानिक वाहतुकदार, माथाडी, मापाडी, वारणार, पालावाल महिला, समिती आवारातील किरकोळ व्यावसायिक, मेहता कर्मचारी याशिवाय अन्य घटकांची जमाबेरीज करता जवळपास लाखाच्या आसपास दररोजचा आकडा जात आहे. या बाजार समिती आवारात परराज्यातून कृषी माल घेवून येणारे तसेच धान्य घेवून येणाऱ्या ट्रकची दररोज संख्या पाहता, या ट्रकवरील चालक व मदतनीस यांची आकडेवारी शेकडोंच्या घरात आहे. याशिवाय पनवेल, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई येथील कानाकोपऱ्यातून खरेदीदार येथील माल घेण्यासाठी येत असतात. परराज्यातून तसेच नवी मुंबईलगतच्या परिसरातून बाजार समिती आवारात येणारा आकडा हजारोच्या घरात असल्याने बाजार समिती प्रशासनानेदेखील उपाययोजना करण्यास सुरूवात केली असल्याची माहिती कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळूंज यांनी दिली.
गर्दीच्या ठिकाणी ओमिक्रॉन फैलावण्याचा धोका अधिक असल्याची शक्यता गृहीत धरून महापालिका व बाजार समिती प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने कोरोना महामारीच्या काळात बाजार समिती प्रशासनाने केंद्र व राज्य सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक कार्यप्रणालीनुसारच बाजार समिती आवारात कार्य करताना नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आम्ही सहकार्यच केले असल्याची माहिती देताना संचालक अशोक वाळूंज पुढे म्हणाले की, बाजार समिती आवारातील विवीध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही मंगळवारी राज्याच्या सहकारमंत्र्यांची भेट घेणार असून त्यात ओमिक्रॉनविषयी करावयाच्या उपाययोजनांबाबतही चर्चा करणार आहोत. कांदा बटाटा मार्केटमध्ये ५० किलोवरील गोणींचा प्रश्न या वादावरही कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे संचालक अशोक वाळूंज यांनी सांगितले.
सध्या मार्केटमधील सर्वच घटकांना मास्क वापरण्याविषयी सूचना करण्यात आल्या असून बाजार समिती अधिकाऱ्यांना सॅनिटायझेशन करण्यासही सांगितले असल्याची माहिती संचालक अशोक वाळूंज यांनी दिली.
महापालिका कोरोना तपासणी व लसीकरणावर देणार भर
एपीएमसी मार्केटमध्ये कर्नाटकातूनही शेतमाल मोठ्या प्रमाणावर येत असतो. मात्र ओमिक्रॉनचे रुग्ण असल्याने अति धोका असलेल्या कर्नाटक राज्यातून एपीएमसीमध्ये आलेल्या वाहनांची आणि लोकांच्या तपासणीत ढिलाई होत आहे. यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव होण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती बाजार समिती आवारातील घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एपीएसमसीमध्ये ओमिक्रोन विषाणू पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आता कोरोना तपासणी आणि लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये गेली सहा महिन्यापासून तपासण्या सुरु आहेत. आता या ठिकाणी लसीकरण वाढवण्यात येणार आहे. एपीएमसी प्रशासन या कामात ढिले पडत असल्याने थोड्या-थोड्या कालावधीने त्याने जागे करावे लागत आहे. याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी त्यांना पुन्हा आदेश देण्यात आले आहेत. शिवाय परराज्यातून येणाऱ्या वाहन चालक व संबंधित लोकांची तपासणी बंधनकारक करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाला देण्यात येतील, असे बांगर यांनी सांगितले.
बाजार समिती प्रशासनानेही केली मास्क सक्ती
संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढवणाऱ्या कोरोना विषाणूने ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या मदतीने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध पुन्हा कडक करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट प्रशासनही सज्ज झाले आहे. एपीएमसीमध्ये प्रवेशासाठी मास्क अनिवार्य करण्यात आला असून ग्राहक, व्यापारी, कामगार सर्वांनीच मास्क घालणे सक्तीचे करण्यात आला आहे.
एपीएमसीच्या पाचही बाजारपेठेच्या उपसचिवांना बाजार आवारात मास्क अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी ट्रक ड्रायव्हर, माथाडी कामगार, व्यापारी तसेच येणाऱ्या ग्राहकांचे संपूर्ण लसीकरण आणि मास्क अनिवार्य केले आहे. तसेच लसीकरणाची व्यवस्थाही एपीएमसी प्रशासनाने केली आहे.
गर्दी कमी करण्यासाठी नवे नियम
एपीएमसी मार्केट्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी रोजच होत असते. दरम्यान भाजी आणि फळ मार्केटमध्ये एकाचवेळी सर्व आवक न आणता टप्प्या टप्प्याने आणून गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. एपीएमसीचे सभापती अशोक डक यांनी याबाबतची माहिती दिली आहे.