संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
नवी मुंबई लाईव्ह न्यूज ब्युरो
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा, सेक्टर ३ मधील रेल्वे स्टेशनलगतच्या कियॉस्क आवारातील नागरी समस्यांचे निवारण करण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सानपाडा सेक्टर ३ मधील रेल्वे स्टेशनलगतच्या परिसरातच कियॉस्क आहेत. छोटे छोटे व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करत असून सानपाडावासियांना स्टेशनमधून बाहेर पडल्यावर घरी जाताना भाज्या, फळे व खाण्यासाठी पार्सल उपलब्ध होतात. या ठिकाणी असलेले पेव्हर ब्लॉक उखडले गेले असून काही ठिकाणी खड्डेही पडले आहे. कालपरवा झालेल्या अवकाळी पाऊसामुळे त्या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणीही साचले असून काही ठिकाणी चिखलही झालेला आहे. सांयकाळी घरी जाण्याच्या घाईमध्ये सानपाडावासियांना पेव्हर ब्लॉकवरून चालताना खड्डे निदर्शनास न आल्याने त्यांना किरकोळ दुखापतीही होत असतात. या ठिकाणी नव्याने पेव्हर ब्लॉक बसविणे अथवा सिमेंट कॉंक्रीटीकरण तातडीने करणे आवश्यक आहे. या ठिकाणी पाहणी अभियान राबविल्यास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल असे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
या परिसरात असलेले पदपथावरील अधिकांश पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रहीवाशांना सांयकाळी ७ नंतर ते पहाटेपर्यत अंधारातच ये-जा करावी लागत आहे. अंधाराचा फायदा घेत समाजविघातक अपप्रवृत्तींकडून विनयभंग, छेडछाड, लुटमार आदी घटना घडण्याची भीती आहे. त्यामुळे संबंधितांना पथदिव्यांच्या दुरूस्तीचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.