संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक आता तीन-चार महिन्यावर येवून ठेपलेल्या असतानाच सत्ताधारी भाजप आणि त्याविरोधात लढणारी महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तसेच राजकीय अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपाला लागलेली गटबाजीची झालर आणि भाजपातील अनेक मातब्बर नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर व दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्र्रेस व कॉंग्रेस यांची एकत्रित महाविकास आघाडी पाहता सध्या महापालिका सभागृहात असलेली सत्ता व राजकीय वर्चस्व टिकविणे भाजपला अवघड जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
एकसदस्यीय पध्दती का त्रिसदस्यीय पध्दती याबाबत संभ्रम कायम असला तरी नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पॅनल पध्दतीनेच लढली जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपामधील प्रस्थापित राजकारण्यांचा पालिकेतील अधिकाऱ्यांवर प्रभाव असला तरी राज्यात असलेली महाविकास आघाडीची सत्ता व शिवसेनेकडे असलेले पालकमंत्रीपद पाहता शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय पातळीवर आपणाला अनुकूल असलेले हवे ते करून घेण्यात महाविकास आघाडीला फारसे अडथळे येणार नाहीत. महापालिका कार्यक्षेत्रात असलेले ऐरोली व बेलापुर विधानसभा मतदारसंघ पाहता आजमितीला ऐरोली विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे महाविकास आघाडीला अनुकूल अर्थातच शिवसेनामय झालेला पहावयास मिळत आहे. त्यातच ऐरोली विधानसभा मतदारसंघातले कोपरखैराणेचे तीन व ऐरोलीतील काही नगरसेवक शिवसेनेच्या उंबरठ्यावर असून आचारसंहितेचे पडघम वाजू लागताच त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघात भाजप व महाविकास आघाडी अनेक ठिकाणी तोडीस तोड असली तरी महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपचा प्रभाव काही प्रमाणात अधिक आहे. ऐरोली व बेलापुर दोन्ही ठिकाणी भाजपचेच आमदार असल्याने ज्या विधानसभा मतदारसंघातून अधिक नगरसेवक निवडून येतील, त्या आमदारांचे भाजप संघटनात्मक वजन अधोरेखित होणार आहे.
भाजपची प्रस्थापित टीम ही राष्ट्रवादी कॉंग्र्रेसला जय महाराष्ट्र करून कमळामध्ये विलीन झालेली आहे. महापालिका स्थापनेपासून भाजपाचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचा राजकीय प्रभाव राहीलेला आहे. पालिका स्थापनेनंतर सुरूवातीच्या तीन महापौरानंतर शिवसेनेला त्या ठिकाणी महापौर विराजमान करता आलेला नाही. महापालिकेच्या मागील पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये गणेश नाईकांना स्पष्ट बहूमत मिळाले नव्हते. बहूमताला चार नगरसेवक कमी पडल्याने अपक्ष नगरसेवक व कॉंग्रेसला सोबत घेवून सत्ता हस्तगत करावी लागली होती. त्यातच गणेश नाईक समर्थक असलेले तुर्भेचा सुरेश कुलकर्णी परिवार, दिघ्याचा गवते परिवार, एमआयडीसीतील यादव परिवार यासह अनेक जण शिवसेनेत गेल्याने भाजपची राजकीय ताकद काही प्रमाणात कमी झालेली आहे. याशिवाय भाजपच्या काही नगरसेवकांना आजही ठाण्याचा लळा असल्याने त्यांच्या भविष्यातील वाटचालीवर संशयास्पद स्वरूपातील प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले आहे. भाजपातील वाढत्या नाराजीचे कारण ‘वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे’ हेच महाराष्ट्रातील चित्र नवी मुंबईत दिसून येत आहे. त्यामुळेच नवी मुंबईचे शिल्पकार असलेल्या लोकनेते गणेश नाईकांबाबत त्यांचे जुने समर्थक आजही आदराने बोलत असले तरी पीएमंडळी व सभोवतालच्या काही बाहूबली घटकांच्या वाढत्या प्रभावाबाबत वेगळ्या भाषेत बोलत आहे. त्यामुळे अजून खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. घणसोलीचा पाटील परिवार बदलत्या राजकीय घडामोडीत बोनकोडेमय झाला असला तरी तेथील स्थानिक मतदारांवर शिवसेनेचा व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव असल्याने पाटील परिवाराचा भाजपला कितपत फायदा झाला, हे निवडणूकीनंततरच स्पष्ट होणार आहे. पीएमंडळीच्या वर्तणूकीमुळे भाजपच्या तिकडच्या छावणीतील निष्ठावंत नगरसेवकांमध्ये बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रेंचे आकर्षण वाढीस लागले असून गौरव बंगल्यावर वर्दळ वाढू लागली आहे.
भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे हमखासपणे निवडून येवू शकणाऱ्या चेहऱ्यांची संख्या आजमितीला अधिक आहे. शिवसेनेकडे किमान ५० चेहरे तर हमखासपणे निवडून येणारे मानले जात आहे. त्यात भाजपमधील फुटीरांचा आकडा वाढूही शकतो. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन्ही मिळून १२ ते १५ चेहऱ्यांचा समावेश असल्याने भाजपला सत्ता राखणे अवघड जाणार आहे. त्यातच पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मंत्री जितेंद्र आव्हाड, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारे शशिकात शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटांची रणनीती, कॉंग्रेसमधील म्हात्रे-कौशिक-शेट्टी या त्रिकुटांचा काही प्रमाणातील प्रभाव याचा एकत्रितपणे सामना भाजपला करावा लागणार आहे. प्रचारादरम्यान विविध बाजूंनी उडणारा धुराळा भाजपला झेलावा लागणार आहे. त्याचप्रमाणे भाजपातील दोन्ही आमदारांमध्ये फारसे सख्य नसल्याची बाब जगजाहिर आहे. अलीकडच्या काळात दोन्ही आमदारांमधील सुसंवाद काही प्रमाणात वाढीस लागला असला तरी शंभर टक्के सख्य होण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच तिकिट वाटपावरून समर्थकांना डावलले गेल्यास पाडापाडीचे राजकारण अधिक होण्याची भीती भाजप कार्यकर्त्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाजपला सत्ता संपादनासाठी महाविकास आघाडीतील नाराजांना चुचकारण्याचे काम करावे लागणार आहे. परंतु महाविकास आघाडीची असलेली हवा, तीन पक्षांची एकत्रित ताकद व भाजपला रोखण्याची खुमखुमी पाहता महापालिकेवर सत्ता राखण्यासाठी भाजपला अग्निदिव्याचा सामना करावा लागणार आहे.