संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजप आणि दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता असतानाच महापालिका निवडणूकीत एमआयएमही सहभागी होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एमआयएम निवडणूक रिंगणात सहभागी झाल्यास भाजपलाच त्याचा फायदा होणार असून महाविकास आघाडीला मतविभागणीमुळे त्याचा फटका बसणार आहे.
राष्ट्रीय राजकारणात भाजप हा हिंदूंची व्होट बॅक तर एमआयएम अलीकडच्या काळात मुस्लिमांची व्होट बॅंक मानली जात आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूकीत मुस्लिम मतदान भाजपला पाहिजे त्या प्रमाणात होणार नसल्याने ते मतदान महाविकास आघाडीसाठी हक्काचे मतदान मानले जात आहे. शिवसेनेचा व त्याखालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मराठी टक्का, कॉग्र्रेसला अजूनही काही प्रमाणात अनुकूल असलेले परप्रांतियांचे मतदान व त्यातच मुस्लिम जनसमुदायाचे हक्काचे मतदान यामुळे भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात आहे. त्यातच भाजपमध्ये सुरू असलेली पडझड व या राजकीय पडझडीचा शिवसेनेत होत असलेला शिरकाव त्यामुळे नवी मुंबईत शिवसेनेकडे असलेले किमान ४० ते ४५ चेहरे हे हमखासपणे नगरसेवक म्हणून निवडून येणार हे निश्चित मानले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर चेहरे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्र्रेस तसेच भाजपकडेही नाहीत.
नवी मुंबईत मुस्लिम समाजाची लोकसंख्या काही लाखाच्या घरात आहे. सिवूड, नेरूळ, बोनकोडे, घणसोली, वाशी, तुर्भे येथील काही महापालिका प्रभागामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या राजकीय घडामोडींवर प्रभाव टाकणारी आहे. त्यातच एकेकाळी कॉंग्रेसची हक्काची असणारी मुस्लिम व्होट बॅंक आता अन्यत्र वळलेली आहे. समाजवादी पक्षाकडे वळालेली मुस्लिम व्होट बॅंक महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे काही प्रमाणात झुकलेली आहे. परंतु अलीकडच्या काळात एमआयएमच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याने याचा फटका भाजपविरोधी पक्षांना बसला असून ही बाब भाजपला फायदेशीर ठरलेली आहे.
एमआयएम नवी मुंबईत थंडावलेली असली तरी महापालिका निवडणूकीत एमआयएम उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या नवी मुंबईत दोन-तीन सभा झाल्या तरी मुस्लिम मतदान एमआयएमकडे एकगठ्ठा वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास सव्वाशे नगरसेवकांचे संख्याबळ असणारे नवी मुंबई महापालिकेचे सहावे सभागृह सार्वत्रिक निवडणूकीनंतर अस्तित्वात येणार आहे. नवी मुंबईत ठराविक भागात एकवटलेला मुस्लिम टक्का हा एमआयएमच्या पदरात पडल्यास ती महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा तर भाजपासाठी शुभसंकेत मानला जाणार आहे. एमआयएमचे काही घटक निवडणूकीसाठी चाचपणी करत असून त्यांची सर्व मतदार ही मुस्लिम मतदारांवर व त्यांचे पक्षप्रमुख खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या प्रचार सभांवर अवलंबून असणार आहे. नवी मुंबईत केजरीवाल यांच्या आपकडूनही निवडणूक लढण्याच्या हालचाली सुरू झाल्याने मतपेटीतून नवी मुंबईत आपला असणारा जनाधारही स्पष्ट होईल.