जबरदस्तीने सेवामुक्त केलेल्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत मैदानात
संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ईएमजी कंपनीने बीव्हीजी कंपनीने कामावर ठेवलेल्या कामगारांना कार्यमुक्त केले, तथापि त्या कामगारांना पूर्ववत कामावर घेवून त्याजागी नवीन कामगारांना न घेण्याबाबत कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका ते थेट मंत्रालय तसेच कॉंग्र्रेस प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष नाना पटोळे आणि कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या कामगारांच्या जागी नवीन कामगार रूग्णालयीन सेवेत भरल्यास व या कामगारांवर अन्याय कायम राहील्यास नवी मुंबई महापालिकेची सर्व रूग्णालये इंटक बंद करेल असा इशारा कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
महापालिका प्र्रशासनात बीव्हीजी कंपनीने कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विभागात कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना ईएमजी कंपनीने कार्यमुक्त केले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी इंटक संघटनेच्या माध्यमातून कामगार नेते रवींद्र सावंत हे महापालिका ते मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करत आहोत. महापालिका आयुक्तांनाही पत्रव्यवहार केलेला आहे. रूग्णालय आस्थापनेत या कामगारांच्या जागी नवीन कामगार आपण घेवू नयेत. तसेच संबंधित ठेकेदारालाही तशा सूचना द्याव्यात. जुन्याच कामगारांना कामावर ठेवावे, त्यांना सुविधा मिळाव्यात, त्यांच्यावर अन्याय होवू नये हीच भूमिका घेत नवीन कामगारांना कामावर घेतल्यास व जुन्या कामगारांवर अन्याय झाल्यास इंटकच्यावतीने आंदोलन छेडले जाईल. वेळ पडल्यास रूग्णालयाला टाळे लावले जाईल. कोरोना महामारीत काम करणाऱ्या कामगारांवर अन्याय होवू नये यासाठी ठेकेदाराला तसे निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आरोग्य विभागाकडे केली आहे. याप्रकरणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे यांच्यासह बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधून कामगारांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखविला. नाना पटोळे यांनी तात्काळ महापालिका प्रशासनाशी संपर्क करत संबंधित कामगारांना सेवेवर घ्यावे, या कामगारांवर अन्याय झाल्यास कॉंग्रेस सहन करणार नसल्याचे पटोळे यांनी महापालिका प्रशासनाला सांगितले.
या कामगारांच्या जागी अन्य कामगार भरल्यास नवी मुंबई इंटक महापालिकेची रूग्णालये कामगारांना न्याय मिळेपर्यत बंद करेल असा इशारा कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.