श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : वाशीतील प्रस्तावित नवीन खाडीपुल व शिवडीपुलामुळे मासेमारीला या उपजिविकेला कायमस्वरूपी बाधित होणाऱ्या नवी मुंबईतील मच्छिमार समाजाला आर्थिक मदत व अन्य सुविधा मिळणेसाठी विशेष पॅकेज जाहिर करण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईतील स्थानिक ग्रामस्थांची ससेहोलपट सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती करावयास घेतली, तेव्हापासून सुरू आहे, ती आजतागायत थांबलेली नाही. भूसंपादनामुळे भातशेती गेली, त्यामुळे तांदूळ विकत घेण्याची वेळ आली आणि भातशेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नालाही मुकावे लागले. सिडकोने गावठाण विस्तार हद्द दर १० वर्षांनी करणे बंधनकारक असतानाही न राबविल्याने ग्रामस्थांना आपल्या कुटूंब विस्तारामुळे गरजेपोटी घरे बांधावी लागली. सिडको व महापालिकेने ती अनधिकृत ठरवित त्यावर हातोडा चालविण्याचे एककलमी अभियान राबविल्याने नवी मुंबईच्या आगरी-कोळी व अन्य स्थानिक समाजबांधवांवर आज बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यात नवी मुंबईत वाढत्या शहरीकरणामुळे कारखानदारी वाढली. दूषित व केमिकलमिश्रित रासायनिक पाणी खाडीत येवू लागल्याने मासेमारीचे प्रमाण कमी झाले. खाडीवर बांधलेल्या उड्डाणपुलामुळे पाण्यात हादरे बसून मासेमारी व्यवसायाचे अस्तित्व संकटात आले. त्यातच आता शिवडी-न्हावाशेवा पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. याशिवाय वाशी खाडीपुलावर तिसरा पुल बांधण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे पाण्यात हादरे बसण्याचे प्रमाण वाढून नवी मुंबईत मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाच्या उपजिविकेवर कायमचेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खाडीत मासेमारी करणे या दोन्ही पुलामुळे शक्य होणार नसल्याने खाडीत मासेमारी करून आपली व आपल्या परिवाराची उपजिविका करणारा येथील मुळ भुमीपुत्र या नवी मुंबईचा खरा मालक असलेला आगरी-कोळी समाज देशोधडीला लागणार आहे. भातशेती गेली, गरजेपोटी बांधलेल्या घरांवर हातोडा चालविला जात असल्याने बेघर होण्याची वेळ आली. आता शिवडी पुल व वाशी खाडीतील बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलामुळे मासेमारीचा व्यवसाय गमवावा लागणार आहे. येथील मासेमारीच संपुष्ठात आल्यावर येथील मासेमारी करणाऱ्या स्थानिक आगरी-कोळी समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. भूसंपादनात आपल्या जमिनी देवून सरकारला सहकार्य केल्याचे बक्षिस त्यांना काय मिळाले? तर आगरी-कोळी समाजाची भातशेती गेली, घरावर हातोडा यामुळे आपल्या जमिनीवर बेघर होण्याची वेळ आली. आता मासेमारीच नाही म्हटल्यावर शासकीय कृप्पेने उपासमारीची वेळ आली. येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर भूमाफियांनी बांधलेल्या चाळी, झोपड्या अधिकृत झाल्यास, मात्र प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे मात्र अनधिकृत ठरली. हे चित्र पाहिल्यावर महाराष्ट्राच्या अन्य भागातील जनता भूसंपादनास सहकार्य करताना शंभर वेळा निश्चितच विचार करेल, असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
सरकारने शिवडी पुल व वाशीतील खाडीपुलामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांना लाख-दीड लाखाची मदत करून त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. ज्यांची मासेमारी गमविल्याने आयुष्यभराची तसेच भावी पिढ्याची भविष्याची उपजिविका कायमस्वरूपी गमविल्याने लाख-दीड लाखाची तुटपुंजी मदत म्हणजे आगरी-कोळी ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. तीही नुकसानभरपाई सरसकटपणे सर्वच ग्रामस्थांना मिळालेली नाही. राज्य सरकारने वाशीतील नवीन खाडीपुल व शिवडी पुल यामुळे मासेमारीचा व्यवसाय गमविणाऱ्या येथील आगरी-कोळी समाजाच्या पुनर्वसनासाठी तसेच भविष्यातील तरतूदीसाठी विशेष पॅकेज त्यांना जाहीर करणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील गावागावातील कोळीवाडे, खाडीकिनारे, जेटी या ठिकाणी जावून मासेमारी करणाऱ्या लहान-मोठ्या बोटी, तसेच हातहोडी यांची गांभीर्याने नोंदणी करावी. कायमचेच बाधित होणाऱ्या मासेमारीवरील अवलंबित्व असणाऱ्या आगरी-कोळी समाजाला घरटी नाही तर त्या घरातील माणसी मदत करण्यात यावी, नवीन उद्योगासाठी अत्यल्प व्याजदरावर दीर्घमुदतीचे कर्ज मच्छिमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला व्यवसायासाठी उपलब्ध करून द्यावे, जामिनदार म्हणून स्वत: सरकारने राहावे. कारण सरकारच्या विकासामुळे, प्रकल्पामुळे मासेमारी करणारा आगरी-कोळी समाज देशोधडीला लागणार आहे. याशिवाय गरजेपोटी बांधलेल्या ग्रामस्थांच्या घरांना सरसकटपणे नियमित कायम करण्यात यावे. मासेमारी गेलीच आहे, किमान बेघर तरी स्थानिक ग्रामस्थांना करू नये. डोक्यावर छप्पर राहीले तर येथील लढवय्या असणारा आगरी-कोळी समाज उपजिविकेसाठी नव्याने संघर्ष तरी करेल. सरकारने आता त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घ्यावा. लवकरात लवकर नवी मुंबईतील खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी व अन्य समाजबांधवांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहिर करून दिलासा देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.