श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारी उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ विभाग कार्यालय कार्यक्षेत्रातील नेरूळ (पूर्व-पश्चिम) आणि जुईनगर नोडमधील विना मास्क आढळून येणाऱ्या रहीवाशांवर व व्यावसायिकांवर कारवाई अभियान राबविण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
३० डिसेंबर २०२१च्या नवी मुंबईतील कोरोना महामारीच्या नवीन रूग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक झाल्याचे पहावयास मिळत आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी कोरोनाच्या नवीन रूग्णांचा आकडा अवघा १६ होता आणि अवघ्या दहा दिवसातच हा कोरोना नवीन रूग्णांचा आकडा २६६ वर जावून पोहोचला आहे. १० दिवसात कोरोना रूग्ण वाढीचा दर १७ पट अधिक झालेला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व कारवाईचे इशारे आता कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्ष राबविण्यास सुरूवात केली नाही तर कोरोना महामारीचा स्फोट होईल आणि याला केवल महापालिका प्रशासनाची कारवाई न करण्यामागची उदासिनताच कारणीभूत राहील, असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळ विभाग कार्यालय कार्यक्षेत्रातील नेरूळ (पूर्व-पश्चिम) आणि जुईनगर नोडमध्ये फेरफटका मारल्यास कोरोना संपुष्ठात आल्याचा भास होईल. रस्त्यावरून चालणारे रहीवाशी, फेरीवाले, दुकानदार, दुकानातील ग्राहक सर्वचजण बिनधास्तपणे विनामास्क आपले व्यवहार करताना पहावयास मिळतील. उद्यान, क्रिडांगणे, सार्वजनिक स्थळे, सकाळी पामबीच चालणारेदेखील विनामास्क आढळून येतील. विनामास्क असणाऱ्या रहीवाशी, फेरीवाले, दुकानदार, दुकानातील ग्राहक आदी सर्वांवर दंडात्मक कारवाई करावी. कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर दुकानदार व ग्राहक दोघांवरही मास्कची सक्ती पाहिजे. ही सक्ती प्रशासनाकडून कागदोपत्रीच असल्याने आता कारवाई अभियान लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे. विना मास्क फिरणारा अथवा व्यवहार करणारा कोणीही असो, त्यास दंडीत करावे. दोन ते तीन वेळा असे कोणी आढळल्यास त्यास पोलिसांकडून त्यांच्या भाषेत समज देण्यात यावी. दुकानदारही विना मास्क दोन ते तीन वेळा दंडीत करूनही विनामास्क असेल व विनामास्क येणाऱ्या ग्राहकांशी व्यवहार करत असेल तर कोरोना महामारी पूर्णपणे जाईपर्यत त्या दुकानाला सील लावावे. कोरोना महामारी संपुष्ठात आणायची असेल तर पालिका प्रशासनाने रस्त्यावर उतरून वेळ पडल्यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने नेरूळ व जुईनगर नोडमध्ये विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई अभियान राबविण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.