बातमीसाठी संपर्क : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील अतिरिक्त भाजी मार्केटमध्ये मार्केटचे लोर्कापण झाल्यापासून गेल्या जवळपास १२ वर्षाच्या कालावधीत या मार्केटच्या समस्या सोडविण्यास बाजार समिती प्रशासनाने उदासितनाच दाखविली आहे. त्यामुळे या मार्केटला कोंडवाड्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने बाजार समिती प्रशासनाच्या नाकर्तेपणावर एकप्रकारचे शिक्कामोर्तबच झाले असल्याची चर्चा राज्याच्या सहकारक्षेत्रात सुरू झाली आहे.
बाजार समिती आवारातील भाजी मार्केटमध्ये परवानाधारक व्यापाऱ्यांची वाढती संख्या आणि त्या पार्श्वभूमीवर जुन्या भाजी मार्केटमध्ये असलेली गाळ्यांची संख्या यामध्ये असमानता निर्माण झाल्याने परवानाधारक बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांना हक्कांच्या गाळ्यांमध्ये व्यापार करता यावा यासाठी बाजार समितीचे तत्कालीन संचालक व राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रणी नेतृत्व असणाऱ्या अशोक गावडे यांच्या प्रशासनदरबारी अथक पाठपुराव्यामुळे २८५ गाळ्यांच्या अतिरिक्त भाजी मार्केटसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली. बिगर गाळाधारकांना स्वमालकीच्या गाळ्यात व्यापार करता यावा यासाठी अशोक गावडे यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये बाजार समिती प्रशासनासह पणन संचालक, पणन मंत्रालय, राज्य सरकार आदी ठिकाणी पाठपुरावा करताना चपला झिजविल्या. परिणामी भाजी मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांसाठी २८५ गाळ्यांचे अतिरिक्त भाजी मार्केट बांधण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला.
भाजी मार्केटमधील बिगर गाळाधारक परंतु परवानाधारक असलेल्या व्यापाऱ्यांकडून बाजार समिती प्रशासनाने गाळ्याची किंमत ५ लाख ८८ हजार रूपये वसूल केली. युनिटी कंन्स्ट्रक्शनला या मार्केटचे बांधकाम देण्यात आले. या मार्केटची बांधकाम दर्जाची गुणवत्ता यासाठी युनिटी कंन्स्ट्रक्शनने दहा वर्षाची मुदतही दिली होती. तथापि मार्केटचे लोर्कापण झाल्यावर अवघ्या वर्षभरातच गाळ्यांमध्ये लिकेजची समस्या निर्माण झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत व्यापारी वर्गाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावू लागले आहे. बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांसाठी बांधलेल्या गाळ्यामध्ये व्यापार न चालल्याने येथील गाळे ओसाड पडले. काही गाळ्यांना गोडाऊनचे स्वरूप प्राप्त झाले. मार्केट ओसाड पडले. व्यापाऱ्यांनी या गाळ्यासाठी काढलेले कर्जही व्यापाऱ्यांना फेडता न आल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. कालपरवापर्यत व्यापाऱ्यांना गाळे घेण्यासाठी काढलेले कर्ज फेडता न आल्याने व्यापाऱ्यांचे गाळे विकण्याची पाळी बाजार समितीमधील पतसंस्थांवर आली आहे.
मार्केटचे लोर्कापण झाल्यापासून बाजार समिती प्रशासन दर महिन्याला गाळ्यामागे प्रत्येक महिन्याला ५०० रूपये (देखभाल शुल्क – मेन्टेंनन्स) व्यापाऱ्यांकडून आकारत आहे. मार्केटचे लोर्कापण झाल्यापासून या मार्केटला १२-१३ वर्षाच्या कालावधीतही गाळ्यांना व मार्केटला एक रूपायाचीही बाजार समिती प्रशासनानेही रंगरंगोटीही केलेली नाही. पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी छतापासून खाली पाणी येणारे पाईप अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत लोंबकळत असून काही ठिकाणी पाईप गळूनही पडले आहे. अतिरिक्त भाजी मार्केट आवारातील वीज व्यवस्थेची जबाबदारी बाजार समिती प्रशासनाची असून पथदिव्यासम असलेल्या विजेरीवरील झाकणेही गळून पडलेली आहेत. मार्केटमधील गाळ्यांच्या बाहेरील भागात ठिकठिकाणी तडे गेले असून वाळू गळत आहे. सिमेंटही उखडले गेले आहे. एका ठिकाणी तर वरच्या भागात असलेल्या पाण्याच्या टाकीला लिकेज असून ती पाण्याची टाकीही धोकादायक बनलेली आहे. मार्केटच्या काही भागात बाहेरील ठिकाणी पाणी वाहताना पहावयास मिळत आहे. एमएसईडीसीच्या मीटर बॉक्सचीही दुरावस्था झाली असून सर्वत्र हे बॉक्सचे ठिकाण खुले असून कोणाचा संपर्क आल्यास जिवितहानी होण्याचीही भीती आहे. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या शौचालयातील बाहेरील भागात पाईपाच्या ठिकाणीही सिमेंट उखडले गेले असून आतील विटा स्पष्टपणे दिसून येत आहेत. बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्य सरकारदरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे या मार्केटमध्ये बहूउद्देशीय कृषी साधनाच्या व्यापारास परवानगी मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांना किमान तेवढा आधार तरी मिळाला आहे. या मार्केटमध्ये भाजी व्यापार होत नसल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपले गाळे विकण्यास सुरूवात केली असून कोरोना महामारीचे आगमन होण्यापूर्वी ५२ लाख रूपयांपर्यत गाळ्यांची विक्री झालेली आहे. कोरोनामुळे गाळ्यांच्या किमंतीत घसरण झाली असून आता अवघ्या ४० लाख रूपयांपर्यत गाळ्यांना गिऱ्हाईक येत असल्याचे मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
बाजार समिती प्रशासनाने या अतिरिक्त भाजी मार्केटमध्ये सुविधा पुरविण्यास व येथील समस्या सोडविण्यास कायमच हात आखडता घेतल्याने मार्केटचे लोर्कापण झाल्यापासून येथे बकालपणाच निर्माण झाल्याचा संताप व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. बाजार समिती प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे या मार्केटच्या लोर्कापणापासूनच सुविधांचा दुष्काळ व समस्यांचा महापुर झाल्याने या मार्केटला कोंडवाड्याचे स्वरूप प्राप्त झाले असल्याची चर्चा राज्यातील सहकार क्षेत्रात सुरू आहे.