स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com -८३६९९२४६४६
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या समस्यांचे निवेदन घेवून नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कर्मचारी प्रतिनिधींसमवेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांचे गांभीर्य व कामगारांना होणारा त्रास, समस्या सोडविण्याबाबत प्रशासनाची उदसिनता कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. यावर समस्यांवर लवकरात लवकर मार्ग काढून कामगारांना दिलासा देण्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन आयुक्त अभिजित बांगर यांनी कामगार नेते रवींद्र सावंत व त्यांच्या समवेत आलेल्या कामगार शिष्टमंडळाला दिले.
गुरूवारी सकाळी महापालिका मुख्यालयात कामगार नेते रवींद्र सावंत यांनी प्रत्येक आस्थापनेतील प्रत्येकी एक-दोन कर्मचारी घेवून त्यांचे शिष्टमंडळ बनवून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान
१) स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता अधिकारी या संवर्गास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा.
२) पदोन्नत झालेल्या स्वच्छता अधिकार्यांना पदस्थापना देण्यात यावी.
३) उप स्वच्छता निरीक्षक ह्या पदासाठी सेवाप्रवेश नियमावलीत १०० % पदोन्नतीचे पद असा बदल करण्यात यावा.
४) प्रशासकीय अधिकारी यांची सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात यावी.
५) अधिक्षक/ वसुली अधिकारी यांची प्रलंबित वेतनश्रेणी व वार्षिक वेतनवाढी देण्यात याव्यात .
६) नमुमपा कर्मचाऱ्यांतील उप आयुक्त संवर्गातील रिक्त ३ पदांवर पदोन्नती अथवा नामनिर्देशन अथवा कार्यभाराने नियुक्ती करण्यात यावी.
७) नमुमपा अधिकाऱ्यांतून नियुक्त करावयाच्या अतिरिक्त आयुक्त या पदावर नमुमपा अधिकाऱ्यांची पदोन्नती, नामनिर्देशन अथवा कार्यभाराने नियुक्ती करण्यात यावी.
८) आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी/ अपघात वैद्यकीय अधिकारी/ कक्षसेवक/ ए एन एम / वर्ग ३ तथा वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी.
९) कर्मचारी/ अधिकारी यांच्या निव्रुत्तीवेतनाची अनेक प्रकरणे प्रलंबित असून निव्रुत्तीवेतन अथवा कुटुंब निव्रुत्तीवेतन मिळत नसल्याच्या तक्रारी उपलब्ध आहेत. ह्या प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी अनुभवी अधिकारी/ कर्मचारी नियुक्त व्हावा.
१०) सेवापुस्तके अद्यावत करण्याचे काम अनुभवी अथवा सेवानिवृत्त कर्मचारी नेमून अथवा प्रशिक्षण देवून अद्ययावत करण्यात यावे.
११) ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा सुविधा मिळावी.
१२) सहाय्यक आरोग्य अधिकारी, दंतशल्य चिकित्सक, आरोग्य सहाय्यक मलेरिया हेल्थ सुपरवायझर, बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक महिला, सहाय्यक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक, लिपिक टंकलेखक, लेखा लिपिक, उप अभियंता स्थापत्य, उप अभियंता विद्युत, उप अभियंता यांत्रिकी, यांच्या सेवाप्रवेश नियमावलीत उचित बदल करण्यात यावेत.
१३) ठोक मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन लागू करणेबाबत.
१४) नमुमपा व परिवहन विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचार्यांस समान काम समान वेतन लागू करणेबाबत.
१५) कक्ष्सेवक/ सेविका यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करणेबाबत.
१६) कोपरखैरणे सेक्टर ११ येथील भूखंड क्र. १४ येथील भूखंडावर कर्मचाऱ्यांसाठी निवास उपलब्ध करुन देण्यात यावेत.
१७) शिक्षण विभागातील कार्यरत बहुउद्देशिय कंत्राटी कामगार ( सुरक्षा रक्षकांच्या) विविध समस्यांची सोडवणूक करण्यात यावी.
१८) परिवहन विभागातील कंत्राटी कामगारांना २०१५ पासूनचा ३३ महिन्यांच्या थकबाकीची पूर्तता व्हावी. तसेच त्यांचा प्रलंबित असलेला एप्रिल २०२१ चा बोनस अदा करण्यात यावा. आशिर्वाद व ओमकार या ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांचे विमा व भविष्य निर्वाह निधी भरला जात नाही कर्मचाऱ्यांना वेतनपावती देण्यात येत नाही. त्याची पूर्तता व्हावी. उपरोक्त कर्मचाऱ्यांनी कोव्हिड रुग्णवाहिका धुण्याचे जोखमीचे काम केले असल्याने त्यांना कोव्हिड भत्ता अदा करण्यात यावा.
१९) परशुराम अम्रुता जाधव हा वरिष्ठ लिपिक चौकशीतून दोषारोपमुक्त झालेला असूनही चौकशी अहवाल प्रलंबित आहे. उपरोक्त अहवाल बजावून त्यास दोषारोपमुक्त करावे व इतरही अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत प्रकरणे दोषारोपमुक्त व अंतिम करण्यात यावे.
२०) कोरोना महामारीच्या काळात इतरत्र बंद असलेली बायोमेट्रीक हजेरी बंद करण्यात यावी.
२१) क्षयरोग नियंत्रण विभागात कार्यरत असलेल्या टीबीएचव्ही/ एसटीएस / एसटीएलएस आदि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या आनुषंगिक मानधनात वेतनवाढ करण्यात यावी.
२२) नमुमपा अधिकारी/ कर्मचारी यांना गटविम्याचे वेतन अदा न करता कॅशलेस विमा सुविधा पुरवुण्यात यावी.
२३) महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील उप स्वच्छता निरीक्षक विनायक पवार यांची वेतनवाढ थांबवली आहे .व त्यांची प्रशासनाने लावलेली चौकशी अद्याप पूर्ण झाली नाही. त्याला कित्येक वर्ष उलटून गेली आहेत. आणि आता ते या जगात हयात नाहीत. त्यांचे २०२१ मध्ये आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांच्या घरामध्ये कुठल्याही स्वरूपाचे उत्पन्नाचे साधन नाही. त्यांची चौकशी पूर्ण करून त्यांनी केलेल्या सेवेचा संपूर्ण मोबदला त्यांच्या कुटुंबास देण्यात यावा . याप्रकरणी आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा.
२४) ए.जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून पालिका प्रशासनात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनातील मागील थकीत फरक व कोरोना महामारीच्या काळातील कोविड -१९ भत्ता तात्काळ मिळण्यात यावा.
कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांपुढे कामगारांच्या या समस्या सादर केल्या व समस्या सोडविण्याची मागणी केली. पालिका प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या समस्या, असुविधा या निवेदनातून मांडताना कामगारांना न्याय मिळण्यासाठी मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निवारण करण्याची मागणीही त्यांनी केली. आयुक्त अभिजित बांगर यांनी लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन संबंधितांना दिले.