श्रीकांत पिंगळे : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत असताना आज जानेवारी महिन्याची ११ तारीख लोटली तरी मूषक नियत्रंक कामगारांचे वेतन झाले नसल्याने या वेतन विलंबाची चौकशी करण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंक विभागातील कामगारांच्या वेतनास विलंब होत आहे. आज ११ जानेवारी. पालिका आस्थापनेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन झालेले असताना केवळ मूषक नियत्रंक विभागातील कामगारांच्या वेतनास विलंब का केला जात आहे, याची आपण प्रशासकीय पातळीवर चौकशी करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केलली आहे.
सकाळ, दुपारी, संध्याकाळी तसेच रात्री उशिराही नवी मुंबई शहरात दिघा ते बेलापुरदरम्यान मूषक मारण्याचे काम करत असतात. गृहनिर्माण सोसायट्याच्या आवारात, सार्वजनिक जागा तसेच गावागावात रात्री-अपरात्री पालिकेचे कोणतेही कर्मचारी-अधिकारी निद्रादेवीच्या स्वाधीन असताना हे कामगार काम करत असतात. मोकाट व भटक्या कुत्र्यांचे हल्ले, गर्दुले-चोरट्यांची भीती व अन्य संकटांचा सामना करत हे कामगार काम करतात. मात्र त्यांच्या वेतनास नेहमीच विलंब होत आहे. या कामगारांचे वेतनही अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळेवर मिळेल यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.