संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उत्साहात सुरूवात करण्यात आली. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मागदर्शनाखाली २०६ शाळांमध्ये केलेल्या लसीकरणाच्या सुयोग्य नियोजनामुळे ३ ते १० जानेवारी या कालावधीत ५६५३७ मुलांचे लसीकरण करण्यात आले असून ते शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या ७७ टक्के आहे. मुलांसह पालकांचाही पहिल्या दिवसापासून उत्साही प्रतिसाद लाभल्यामुळे १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणातही महानगरपालिकेने आघाडी घेतलेली आहे.
१८ वर्षावरील कोव्हीड लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई महानगरपालिका एमएआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका ठरली असून कोव्हीड लसीचे दोन्ही डोसही १० लाखाहून अधिक नागरिकांनी म्हणजेच ९०.६२ टक्के नागरिकांनी घेतलेले आहेत.
लसीकरणाचा आढावा घेताना आयुक्तांनी १५ ते १८ वयोगटातील उर्वरित मुलांचे लसीकरण करून घेण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश शिक्षण विभागास दिलेले आहेत. या अनुषंगाने सर्व शाळा व्यवस्थापनांशी संपर्क साधून विविध कारणांमुळे लसीकरण होऊ न शकलेल्या मुलांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला जात आहे.
उर्वरित मुलांच्या लसीकरणाबाबत दुसऱ्या सत्राचे नियोजन करण्यात आलेले असून त्यानुसार ज्या शाळांमधील २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे बाकी आहे अशा शाळांमध्ये ११ ते १४ जानेवारी या कालावधीत विशेष लसीकरण सत्रे राबविली जात आहेत. याबाबतची माहिती संबंधित शाळांमार्फत विद्यार्थ्यांना दिली जात आहे.
याशिवाय ज्या शाळांमधील लसीकरण न झालेल्या मुलांची संख्या २० पेक्षा कमी आहे अशा शाळांमधील मुलांसाठी महानगरपालिकेची वाशी, नेरूळ, ऐरोली, तुर्भे येथील रूग्णालये तसेच २३ नागरी आरोग्य केंद्रे अशा २७ ठिकाणी सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरण करून घेण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याशिवाय लसीकरण बाकी असलेले विद्यार्थी आपल्या शाळेजवळ असलेल्या नजिकच्या शाळेत विशेष लसीकरण सत्र असल्यास त्याठिकाणीही जाऊन लसीचा डोस घेऊ शकतात, असे शाळांना कळविण्यात आलेले आहे व आवाहन करण्यात येत आहे.
कोव्हीडचा वाढता प्रसार बघता व कोव्हीड लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली तरी त्याची तीव्रता मर्यादीत राहते हा अनुभव लक्षात घेता तत्परतेने लसीकरण करून घेण्यावर महानगरपालिकेच्या वतीने भर दिला जात असून त्यादृष्टीने सुयोग्य नियोजन करण्यात आलेले आहे. तरी पालकांनी आपल्या १५ ते १८ वयोगटातील मुलामुलीला अत्यंत सुरक्षित असलेल्या कोव्हीड लसीचा डोस द्यावयाचा राहून गेला असल्यास त्वरित आपल्या शाळेत अथवा नजिकच्या महापालिका रूग्णालयात किंवा नागरी आरोग्य केंद्रात नेऊन लसीचा डोस द्यावा तसेच पालकांचाही दुसरा डोस घ्यायचा राहिला असल्यास विहित मुदत झाली की त्वरित दुसरा डोस घ्यावा आणि लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा नियमित वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.