संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील
संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : येऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने स्वबळावर लढण्यासाठी ‘एकला चलो रे’ची जोरदार तयारी केली आहे. नेरूळ तालुक्यात कॉंग्रेसकडून संघटना बांधणीवर गेल्या काही महिन्यात जोर दिला जात असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मारूती रामचंद्र माने यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह कामगार नेते व नेरूळ ब्लॉक कॉंग्र्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ येथील कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मारूती माने यांच्याकडे युवकांचे मोठे संघटन असल्याने रवींद्र सावंत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा झटका दिला असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.
नवी मुंबईत विविध आंदोलने, निदर्शने आदींच्या माध्यमातून कामगार नेते व कॉंग्रेसचे पदाधिकारी रवींद्र सावंत यांनी कॉंग्रेस पक्ष जनसामान्यांमध्ये चर्चेमध्ये ठेवण्याचे सातत्याने काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यापासून नाना पटोले यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या रवींद्र सावंत यांनी गेल्या काही महिन्यापासून संघटना बांधणीवर विशेष भर दिला आहे. नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या पक्षसंघटनात्मक राजकीय घडामोडी वाढत असल्याने महाविकास आघाडीतील इतर दोन सहकारी पक्षांना व भाजपला त्रासदायकच ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
नेरूळमध्ये प्रभाग ८४, ८५, ९६, ९७ या ठिकाणी कॉंग्रेसकडून नव्याने वॉर्ड अध्यक्ष नियुक्त करण्यात आले असून रवींद्र सावंत यांनी नेरूळमध्ये प्रभागाप्रभागात संघटना बांधणीला जोर देताना पक्ष जनातभिमुख करण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देशही दिले आहेत. राष्ट्रवादीच्या मारूती रामचंद्र माने यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घटना कॉंग्रेसला बळकटी आणणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूका तोंडावर आल्या असताना रवींद्र सावंत यांची संघटनाबांधणी चर्चेचा विषय बनली आहे. पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी कामगार नेते रवींद्र सावंत, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, ब्लॉक उपाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे नवी मुंबई अध्यक्ष संतोष सुतार, प्रभाग ९७चे वॉर्ड अध्यक्ष वामन रंगारी, प्रभाग ९६ चे वॉर्ड अध्यक्ष उत्तम राक्षे, राहूल कापडणे, उत्तम पिसाळ, दिपक गावडे, सुनील जवळ यांच्यासह कॉंग्रेसचे कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. मारूती माने यांच्यासमवेत युवकांनी मोठ्या संख्येने कॉग्रेसमध्ये प्रवेश केल्याने रवींद्र सावंत नेरूळ नोडमध्ये भाजप, महाविकास आघाडीला ऐन महापालिका निवडणूकीत त्रासदायक ठरणार असल्याचे चित्र आताच निर्माण झाले आहे.