श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : डासांच्या उद्रेकाने त्रस्त झालेल्या नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना आणि सारसोळेच्या ग्रामस्थांना दिलासा देण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर ६ आणि सारसोळे गावात डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. सारसोळेचे ग्रामस्थ आणि नेरूळ सेक्टर ६ चे रहीवाशी डासांमुळे त्रस्त झाले आहेत. सांयकाळी ६ नंतरच घराची दारे-खिडक्या बंद करून घ्याव्या लागत आहेत. सार्वजनिक उद्यानातही बसणे अवघड झाले आहे. सोसायटी आवारातही डासांमुळे थांबता येत नाही. डासांच्या उद्रेकामुळे मलेरियाचे रूग्ण पुन्हा वाढीस लागले आहेत. खासगी दवाखान्यात हे रूग्ण मलेरियावर उपचार घेत असल्याने पालिका प्रशासन दफ्तरी या रूग्णांची नोंद होत नाही आणि समस्येचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही. गटारांतील तळापासून सफाई झाल्यास डासांचा व दुर्गंधीचा प्रादुर्भाव कमी होईल. नेरूळ सेक्टर ६ व सारसोळे गावातील डासांची समस्या संपुष्ठात आणण्यासाठी वेळीच कार्यवाही न झाल्यास साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर सातत्याने धुरीकरण, गटारांमध्ये अळीनाशके व गटारांची वरचेवर तळापासून सफाई होणे आवश्यक आहे. डासांच्या समस्येचे निवारण करून लवकरात लवकर सारसोळे गावच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.