संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदामध्ये मराठी साहित्याची गोडी वाढावी तसेच यामधून कार्यालयीन कामकाजातही उत्तम मराठी भाषेचा वापर व्हावा यादृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये मराठी भाषेतील अभिजात साहित्यकृतींमधील आपल्या आवडत्या निवडक भागाचे अभिवाचन करण्याच्या वैशिष्टयपूर्ण कार्यक्रमात १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत त्या पुस्तकाविषयीची उत्सुकता श्रोत्यांच्या मनात जागविली. अभिवाचन उपक्रमाच्या प्रारंभी दिवंगत साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रंगलेल्या पुस्तके अभिवाचन कार्यक्रमात महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांनी मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र मानल्या जाणाऱ्या ‘श्यामची आई’ या अजरामर पुस्तकातील निवडक भागाचे अभिवाचन करीत उत्तम सुरूवात केली. शिक्षण विभागाचे उपआयुक्त जयदीप पवार यांनी ‘एक होता कार्व्हर’, विधी अधिकारी अभय जाधव यांनी ‘लोकरंग’, उपमुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे यांनी ‘शिवाजी – द मॅनेजमेंट गुरू’ अशा वाचनीय पुस्तकांमधील काही भागाचे अभिवाचन केले आणि पुस्तक संपूर्ण वाचण्याविषयीची उत्सुकता श्रोत्यांच्या मनात जागृत केली. अरविंद उरसळ, पुष्पांजली कर्वे, रवी जाधव, प्रकाश बागडे, मिनाक्षी गोतमारे, प्रिती जाधव, शर्मिली दिघे, सीमा बनसोडे, प्रतिक्षा कांबळे, पुजा भोसले, मयुरी जाधव या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आपल्या आवडत्या पुस्तकांतील निवडक भागाचे अभिवाचन केले.
नवी मुंबई महापालिकेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोर पालन करून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे प्रत्यक्ष आयोजन केलेच शिवाय हे कार्यक्रम महानगरपालिकेच्या फेसबुक लाईव्ह पेजवरून प्रसारित करीत हजारो साहित्यप्रेमींनाही मराठी भाषेच्या साहित्य जागरात सहभागी करून घेतले.