संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या नागरी समस्याविषयी जनसंपर्कासाठी आवश्यक असणाऱ्या भ्रमणध्वनी व महापालिका मेल आयडीविषयी प्रशासनाने सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपाचे युवा नेते व समाजसेवक पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीतील दिघा ते बेलापुर दरम्यान कोठेही नागरी समस्या अचानक निर्माण झाल्यास रहीवाशांना कोठे संपर्क करावयाचा याची माहिती नसल्याने त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागतो. त्यामुळे अनेकदा रहीवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. राजकीय घटकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली वावरावे लागते. नवी मुंबईकर कर भरतात, समस्या निवारणासाठी अथवा सुविधा मागण्यासाठी त्यांचा पालिका प्रशासनाशी थेट संपर्क असावा, यासाठी कोणा राजकारण्यांची मध्यस्थी नसावी यासाठी महापालिका प्रशासनाकडून समस्या निवारणासाठी जनसंपर्क कोणत्या क्रमाकांवर करावा, कोणत्या मेलआयडीवर लेखी तक्रार करावी यासाठी पालिका प्रशासनाकडून जनजागृती होणे आवश्यक असल्याचे समाजसेवक पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
शहरातील विविध भागात अनेकदा रस्त्यावरील पथदिवे नसल्याने अथवा जे आहेत ते बंद असल्याने रहीवाशांना अंधारात ये-जा करावी लागते. पाणी न आल्यास महिलांना त्रास होतो. रस्त्यावरील मल:निस्सारण पाण्याची टाकी फुटते. कधी मोकाट कुत्र्यांचा उपद्रव अथवा रस्त्यावर मृत अवस्थेत पडणे, गटारांची सफाई न झाल्याने दुर्गंधी सहन करावी लागणे अशा विविध किरकोळ नागरी समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून नवी मुंबईकरांनी सुसंवाद कोठे करावा यासाठी जनजागृती करावी यासाठी हे निवेदन सादर करत असल्याचे समाजसेवक पांडुरंग आमले यांनी सांगितले.
पाणी गेल्यास या क्रमाकांवर, पथदिवे बंद असल्यास या क्रमाकांवर, मोकाट कुत्र्यांचा त्रास अथवा बेवारस जनावरांच्या मृतदेहाची समस्या असल्यास या क्रमाकांवर,रस्त्यावरील मल:निस्सारण टाकी फुटल्यास या क्रमाकांवर, गटारांची दुर्गंधी अथवा डासांचा त्रास असल्यास या क्रमाकांवर अशा स्वरूपात जनजागृती त्या त्या वॉर्ड ऑफिस स्तरावर करण्यात यावी. अनेकदा फोन बंद असल्यास अथवा उचलला न गेल्यास या मेलआयडीवर फोटोसह तक्रार करावी यासाठी मेलआयडीदेखील पालिका प्रशासनाकडून प्रसिध्द करण्यात यावे. याबाबत त्या त्या विभाग कार्यालयांतर्गत हे संपर्क ध्वनी व मेल आयडी पालिका प्रशासनाकडून त्यांच्या फेसबुकवर प्रसिध्द केल्यास अथवा प्रेसनोट बनवून बातमीच्या माध्यमातून प्रसिध्दी माध्यमांना दिल्यास नवी मुंबईकरांना नागरी सुविधांसाठी व नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाशी सुसंवाद साधणे सोपे जाईल. कोणा राजकारण्यांच्या दबावाखाली वावरावेही लागणार नाही. प्रशासन व नवी मुंबईकर यांच्यात थेट सुसंवाद राहील, यामुळे पुढाकार घेवून जनसंपर्कासाठी विभाग कार्यालय स्तरावर संपर्क ध्वनी व मेलआयडी पालिका फेसबुकच्या माध्यमातून तसेच प्रसिध्दी माध्यमातून नवी मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याची मागणी समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केली आहे.