स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : कोरोना महामारीचा अचानक तिसऱ्या लाटेचा निर्माण झालेला उद्रेक आता आटोक्यात आला असून १ फेब्रुवारीला कोरोनाचे नवीन रूग्ण २९८ आढळून आले आहेत. मध्यंतरी दोन हजाराने आकडा ओंलाडला असताना व एक हजार कोरोना रूग्ण सापडत असताना एक फेब्रुवारीला तीनशेच्या आत कोरोना रूग्णांचा आकडा आल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तथापी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना महामारीने चार जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोना नवरूग्णांचा आकडा कमी होत असला तरी मृत्यूची संख्या ‘टेन्शन’ वाढविणारी आहे.
२०२२च्या सुरूवातीलाच कोरोना महामारीचा उद्रेक सुरू असताना जानेवारी महिन्यात कोरोनामुळे ४८ नवी मुंबईकरांचा झालेला मृत्यू मनाला चुटपुट लावणारी बाब मानली जात आहे. कोरोना महामारीमुळे पहिल्या पंधरवड्यात १ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान अवघ्या ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र १६ जानेवारी ते ३१ जानेवारी या दुसऱ्या पंधरवड्यात ४१ नवी मुंबईकरांचा मृत्यू झाला आहे. १, ३, ४, ५, ७, ८, ९, १०, ११, १५, १८ जानेवारी या अकरा दिवसात कोरोनामुळे नवी मुंबईत एकही मृत्यू झाला नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब मानावी लागेल. अन्यथा कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येने शतकाच्या जवळपास मजल मारली असती. एकीकडे कोरोना नवरूग्णांची संख्या नियत्रंणात आली असली तरी मागील पंधरवड्यात कोरोना मृत्यूची संख्या ४१ असून एक फेब्रुवारी कोरोनाने ४ जणांचा मृत्यू झाला असल्याने कोरोनाच्या भयाची टांगती तलवार आजही नवी मुंबईकरांवर कायम असल्याचे सरकारी आकडेवारीवरून पहावयास मिळत आहे.