श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील भिक्षेकऱ्यांनाही कोव्हिड १९ ची लस देण्याची मागणी पत्रकार – समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहराने कोरोना महामारीच्या एक,दोन नव्हे तर तीन लाटांचा सामना केलेला आहे. दिवसाला शंभरपासून ते अडीच-तीन हजारांचा दररोजचा आकडा नवकोरोना रूग्णांचा या शहराने जवळुन पाहिला आहे. कोरोनामुळे अनेक कुंटूंब अनाथ झाल्याचे या शहराने जवळून अनुभवलेही आहे. महापालिका प्रशासनाच्या अथक प्रयासामुळे नवी मुंबईत कोरोना महामारी आज आटोक्यात आल्याचे, नियत्रणांत आल्याचे वास्तववादी सत्य कोणालाही नाकारता येणार नसल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
शहरात शंभर टक्के लसीकरणाच्या आपण जवळपास पोहोचलो आहोत. अगदी शहरातील रखवालीदारीचे काम करणाऱ्या नेपाळी बांधवांसाठीही आपण विशेष लसीकरणाचे अभियान राबविले आहे. परंतु या शहरातील भिक्षेकऱ्यांचे लसीकरण अजूनही झालेले नाही. या भिक्षेकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे आधारकार्ड व अन्य कागदपत्र नसतात., त्यांचे जोपर्यत कोरोना लसीकरण होत नाही, तोपर्यत या शहरात शंभर टक्के लसीकरण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाला करता येणार नाही. हे भिक्षेकऱी दिघा ते बेलापुरदरम्यान मोठ्या संख्येने दिसून येतात, रस्त्यावर, पदपथावर, रेल्वे स्टेशनचा परिसर, दुकानांच्या आडोशाला झोपतात. या भिक्षेकऱ्यांचा भिक मागण्याच्या निमित्ताने सिग्नलवर वाहन थांबल्यावर, दुकानदार, अथवा पदपथावरून जाणाऱ्या नवी मुंबईकरांशी संपर्क येतो, त्यामुळे आजही शहरातील हे भिक्षेकऱी एकप्रकारचे कोरोना प्रसारकाचेच काम करत आहेत. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने विभाग कार्यालयस्तरावर माता बालरूग्णालय तसेच नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून काही दिवस या भिक्षेकऱ्यांसाठी विशेष लसीकरण अभियान राबवावे. रिक्षातून तसेच प्रसिध्दीमाध्यमातून अथवा सोशल मिडियातून भिक्षेकऱ्यांसाठी कोरोना लसीकरणाविषयी जनजागृती करावी. शंभर टक्के लसीकरणासाठी व या शहराला खऱ्या अर्थाने कोरोना मुक्त करण्यासाठी भिक्षेकऱ्यांसाठी विशेष लसीकरण अभियान राबविण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.