स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सोसायटी आवारात कंपोस्ट खत बनविण्याच्या निर्णयाची महापालिका प्र्रशासनाने सक्ति न करण्याची मागणी नेरूळ ब्लॉक कॉंग्र्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना कंपोस्ट खत बनविण्याविषयी सोसायटी आवारातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याविषयी लेखी पत्राच्या माध्यमातून सूचित केले आहे. यामध्ये माझ्या निवासी भागातील नेरूळ सेक्टर चारमधील गृहनिर्माण सोसायट्यांचाही समावेश आहे. मुळातच नवी मुंबईकर नागरिक महापालिका प्रशासनाला नियमित स्वरूपात कराचा भरणा करत असतात. या कराच्या बळावर महापालिका प्रशासनाचा आस्थापनेवरील सर्व खर्च भागून नागरी सुविधांची कामेही मार्गी लागत असतात. नवी मुंबईकर भरत असलेल्या करामुळे महापालिका प्रशासनाला स्वमालकीचे धरण खरेदी करणे शक्य झाले असून अडीच हजार कोटीच्या एफडी बनविणे शक्य झाले आहे. नवी मुंबईकर भरत असलेल्या करातून त्यांना नागरी सुविधा मिळणे आणि त्यांच्या नागरी समस्या सोडविणे इतपतच त्या सर्वसामान्य नवी मुंबईकरांची अपेक्षा असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
सध्या महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर चारमधील सिडको सोसायट्यांना सोसायटी आवारातील कचऱ्याची सोसायटी आवारातच विल्हेवाट लावून कंपोस्ट खत बनविण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि आपण हे लेखी पत्र देण्यापूर्वी नवी मुंबईतील सिडको गृहनिर्माण सोसायटी तसेच खासगी गृहनिर्माण सोसायटी आवारातील मोकळ्या जागांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये एफएसआयच्या माध्यमातून रहीवाशांनी अतिरिक्त रूम वाढवल्याने सोसायटी आवारामध्ये रिक्त जागा कमी राहीलेली आहे. तसेच सोसायटी आवारातील रहीवाशांकडे असलेली दुचाकी व चारचाकी वाहने जमेस धरता सोसायटीतील सदनिकाधारकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी सोसायटी आवारातच जागा मिळत नसल्याने त्यांना परिसरातील रस्त्यांच्या कोपऱ्यावर अथवा मिळेल त्या मोकळ्या जागेवर वाहने उभी करावी लागत आहेत. कंपोस्ट खतासाठी अधिकांश सोसायटी आवारात जागाच शिल्लक नाही.
तसेच कंपोस्ट खतासाठी खड्डा कोठे खोदायचा अथवा कचरा संकलनासाठी रॅक कोठे ठेवायचे यावरून गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांमध्ये वाद सुरू झाले आहेत. कंपोस्ट खताचा वास येत असल्याने दुर्गंधी का सहन करायची यावरून कलह वाढू लागले आहेत. कालपर्यत घरातल्या सदस्यांप्रमाणे वावरणारे रहीवाशी मनपाच्या कंपोस्ट खत पत्रावरून एकमेकांमध्ये वाद करून त्यांच्यात वितुष्ठ आले आहे. मुळातच सोसायट्यांमध्ये त्यांच्या वाहनांनाच (अगदी दुचाकीही) पार्कीगसाठी जागा नसल्याने त्यांनी कंपोस्ट खत बनविण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी अथवा रॅक ठेवण्यासाठी कोठे जागा उपलब्ध करायची? यावर महापालिका प्रशासनानेच पाहणी करणे आवश्यक आहे.
सोसायटी आवारात कंपोस्ट खतासाठी खड्डे घेण्याची अथवा रॅक ठेवण्याची दडपशाही न करता त्याऐवजी कचरा वाहतुक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढवावी, दिवसातून दोन ते तीन वेळा रहीवाशांचा कचरा उचलला गेल्यास सोसायटी आवारात तसेच परिसरात शून्य कचरा पहावयास मिळेल. यामुळे कंपोस्ट खताची समस्या निकाली निघून रहीवाशांमधील वादाच्या घटना टळतील आणि झालीच तर त्यामुळे काही प्रमाणात रोजगार निर्मिती होवून बेरोजगारांना उपजिविकाही प्राप्त होणार असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका प्रशासन शहर स्वच्छता अभियानांर्तगत बंगलोर व अन्य शहराची तुलना करताना आपल्याकडे हा पर्याय राबवित आहात. पण तेथील परिस्थिती व आपली परिस्थिती यात फरक आहे. तेथील रस्ते पाण्यानी धूवून स्वच्छ केले जातात. आपल्याकडे तशी परिस्थिती आहे का? तेथील इमारतींचा परिसर आहे. नवी मुंबईत झोपडपट्टी, चाळी, खासगी इमारती, सिडकोच्या इमारती, टोलेजंग टॉवर अशा विविध विषमतेचा समावेश आहे. नवी मुंबईकर कराचा भरणा करत असताना व सोसायटी आवारात कंपोस्ट खतासाठी जागा नसताना पालिका प्रशासनाने त्यांना निर्णय राबविण्यासाठी दडपशाही करू नये. खासगी संस्था, वाहन चालक सोसायटी आवारातून कचरा घेवून जाण्यासाठी तयार आहेत, पण त्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारण्याची मागणी केली जात आहे. नवी मुंबईकर कर भरत असताना त्यांच्या नागरी समस्या सोडविणे व त्यांना नागरी सुविधा देणे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. नवी मुंबईकरांनी भरलेल्या करातूनच पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन होत असते. एकवेळ शंभर-दोनशे रूपये कर वाढवा, पण कंपोस्ट खताबाबत दडपशाही करू नका, अशी मागणी रहीवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे करदात्या नवी मुंबईकरांवर कंपोस्ट खताबाबत दडपशाही न करता कचरा संकलनासाठी व वाहतुकीसाठी छोटी वाहने वाढवा, पण महापालिका प्रशासनाने कंपोस्ट खताबाबत खड्डे करण्यासाठी दबाव न आणता नवी मुंबईकरांना नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न करा. कोरोना महामारीत नवी मुंबईकर उध्दवस्त झाले असून ते नुकतेच आता सावरण्याचा नव्याने प्रयत्न करत आहेत. त्यांना जगू द्या, त्रास देवू नका. कंपोस्ट खताबाबत सोसायटी आवारात खड्डे घेण्याची अथवा रॅक ठेवण्याची सक्ती करू नका. एकतर सोसायटी आवारात जागा नाही, वाहने पार्किग करता येत नाही. त्यात हे नव्याने खूळ कशासाठी. एकवेळ मालमत्ता करात वाढ करा,पण हा कंपोस्ट खतासाठी सोसायटी आवारात खड्डे घेण्यासाठी अथवा रॅक ठेवण्यासाठी दबाव टाकणे थांबवा, करदात्यांना यामुळे मानसिक त्रास देण्याचा हा प्रकार असून खासगी कचरा वाहतुकदारांचे यातून उखळ पांढरे होणार आहे. बाकी काही नाही. महापालिका प्रशासनाने यावर विचार करून निर्णय स्थगित करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.
इंदौर शहराचा आदर्श देशात सर्वत्र घेतला जातो. इंदौर शहरातही कचरा विल्हेवाट न लावू शकणाऱ्या सोसायट्यांचा कचरा महापालिका उचलत आहे. अशा धर्तीवर नवी मुंबई महापालिकेने नागरिकांचा कचरा उचलून खर्च घ्यावा. शेजारच्या पनवेल महापालिकेने कचरा वाहतुकीचा खर्च नागरिकांकडून घेऊन लहान सोसायट्यांना दिलासा दिला आहे. याबाबत नवी मुंबई महापालिका मागे कशी राहिली. आपण आणलेले धोरण हे खाजगी संस्थांची खळगी भरण्याचे काम करीत आहे. महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था असताना खत निर्मिती करणाऱ्या त्रयस्थ खाजगी संस्थांची जाहिरातबाजी कशी काय करते. याबाबत नागरिकांचा आक्षेप आहे. सध्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन त्याचा गैरफायदा घेत असल्याचे या वरून अधोरेखित होत आहे. आपण लवकरात लवकर लहान सोसायट्यांवर कचरा विल्हेवाट लावण्याबाबत केलेली बंधने मागे घेऊन पर्याय शोधावा. अन्यथा आम्हाला जनहितासाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.