स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : कोरोना संदर्भात बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली असून यामुळे महाराष्ट्राचा जाणिवपूर्वक अपमान झाला असल्याचे सांगत नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीने नेरुळ सेक्टर दोन परिसरातील चौकात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ‘शर्म करो मोदी’ हे आंदोलन करून मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. मोदींच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रीयन जनतेच्या भावना दुखावल्याने त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी ही मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
कोरोना काळात रहीवाशी आपल्या राज्यात ये-जा करत होते, त्यामुळे कोरोनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र सरकारबाबत वक्तव्य केले. हे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असून उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केले असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे. मोदी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सांगत कॉंग्रेसकडून आज राज्यभरात आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी पक्षाच्या आदेशानुसार ‘शर्म करो मोदी’ या आंदोलनाचे नेरूळ सेक्टर २ येथे आयोजन केले होते.
यावेळी नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, कामगार नेते व आंदोलनाचे आयोजक रविंद्र सावंत, कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे नवी मुंबई अध्यक्ष संतोष सुतार, जिल्हा सचिव संध्या कोकाटे, विद्या भांडेकर यांनी प्रसंगानुरूप समयोचित भाषण करताना कोरोना काळात राज्य सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना मोदी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशची मते मिळविण्यासाठी दिशाभूल करत आहेत व महाराष्ट्राचा अपमान करत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रीयन जनतेची मने मतांच्या राजकारणासाठी मोदी यांनी दुखविल्याने त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणातून केली.
यावेळी मोदी हटाव, देश बचाव, माफी मागा – महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, नाही चालणार-नाही चालणार ,मोदींची हुकूमशाही नाही चालणार यासह विविध घोषणा देवून मोदी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलनात कॉंग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका मिरा पाटील, कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे नवी मुंबई अध्यक्ष अनवर हवलदार, संध्या कोकाटे, सचिन नाईक, प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी, उत्तम राक्षे, मारूती माने, वामन रंगारी, महेश भणगे, संतोष पाटील, बागाव यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.