स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनामध्ये काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन विलंबाने करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्याकडून काम काढून घेण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
आज १० फेब्रुवारी. महापालिका आस्थापनेतील सर्व कायम सेवेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन झालेले आहे. पालिका आस्थापनेत काम करणाऱ्या ठोक मानधनावरील तसेच विविध आस्थापनेत काम करणारे कंत्राटी कामगार यांचेही जानेवारी महिन्याचे वेतन झालेले आहे. केवळ मूषक नियत्रंण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अजूनही वेतन झालेले नाही. प्रत्येक महिन्याला या कामगारांचे वेतन ठेकेदाराकडून जाणिवपूर्वक विलंबाने होत आहे. दर महिन्याला आपणास तक्रारपत्र पाठवून वेतनास विलंब झाल्याची कल्पना द्यावी लागत आहे. सर्वच कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेवर होत असताना केवळ मूषक नियत्रंण कामगारांच्याच वेतनास विलंब का होत आहे, याबाबत आपण ठेकेदाराला जाब विचारून त्यांच्याकडे लेखी खुलासा मागविण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
मूषक नियत्रंणचा ठेकेदार हा काय महापालिकेचा जावई आहे काय? दर महिन्याला कामगारांचे वेतनास विलंब करत आहे. मागे तर दोन ते तीन महिने या कामगारांचे वेतन थकविण्यात आले होते. एकाच ठेकेदाराला वर्षानुवर्षे मूषक नियत्रंणचा ठेका मिळत असल्याने कामगारांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. दर महिन्याला मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन विलंबाने करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नवीन ठेकेदार नेमावा अथवा महापालिका प्रशासनाकडून या कामगारांचे वेतन करण्यात यावे . पण या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्यास मूषक नियत्रंणाचे काम कधीही देवू नये. वर्षानुवर्षे मूषक नियत्रंण कामगारांचे वेतनास विलंब जाणिवपूर्वक होत असल्याने ठेकेदारावर लवकरात लवकर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.