नवी मुंबई : कोरोना महामारीचे नवी मुंबईतील प्रमाण कमी झाल्याने शहरातील उद्याने नवी मुंबईकरांसाठी पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची मागणी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व उद्याने बंद केली आहेत. कोरोना महामारीचे प्रमाण आटोक्यात आले असून प्रशासनाकडून निर्बंध कमी केले असून जनजीवनही पूर्वपदावर आले आहे. सध्या महापालिका प्रशासनाने उद्याने अजूनही सुरू केलेली नाही. जी सुरू आहेत, ती मोजक्याच वेळेपुरती उघडण्यात येतात व लगेच बंद केली जातात. सकाळी काही कालावधीकरीता उद्याने उघडण्यात येतात. सांयकाळच्या वेळी उद्याने बंदच असतात. त्यामुळे नवी मुंबईकरांना उद्यानांचा वापर करणे शक्य होत नाही. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत लॉकडाऊनच्या तसेच अन्य नियमांमुळे नवी मुंबईकरांना विशेषत: महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना घरामध्येच बसून राहावे लागले आहे. लोक घरात बसून त्रस्त झाले आहेत. त्यातच उद्याने बंद असल्याने लोकांना त्याचा वापर करणे शक्य होत नाही. नवी मुंबईकरांना उद्यानाचा उपभोग घेता यावा यासाठी आपण उद्याने पूर्णवेळ खुली करण्याकरीता सकारात्मक निर्णय घ्यावा. आपण कोरोना महामारीचे कमी झालेले प्रमाण व प्रशासकीय पातळीवर कमी झालेले निर्बंध पाहता शहरातील महापालिकेची उद्याने लोकांसाठी खुली करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयु्क्तांकडे केली आहे.