नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या उद्यान व क्रिडांगणाची तुटलेली प्रवेशद्वारे, मॉर्निग वॉकच्या जागेवरील उखडलेल्या लाद्या, तुटलेली खेळणी, सार्वजनिक शौचालयाची दुर्गंधी हेच गेल्या अनेक महिन्यापासून चित्र आहे. महापालिका आयुक्तांना सातत्याने समस्या निवारणासाठी लेखी तक्रारपत्रे सादर करूनही त्यांच्या कार्यालयाकडून तक्रारपत्रे संबंधितांना केवळ फॉरवर्ड केली जातात, कार्यवाही होत नाही. त्यामुळे या समस्या निवारणासाठी १२ फेब्रुवारी रोजी पुन्हा महापालिका आयुक्तांना लेखी तक्रारपत्र सादर करताना तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार हीच नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना उद्यानाची सुविधा का? असा प्रश्न समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी तक्रारपत्रातून महापालिका आयुक्तांना विचारला आहे.
११ डिसेंबर २०२१, २४ डिसेंबर २०२१, ११ जानेवारी २०२२, २२ जानेवारी २०२२ रोजी या विषयावर यापूर्वी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाला तक्रारपत्र सादर करत समस्येचे गांभीर्य व नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना आणि सारसोळे गावच्या ग्रामस्थांना उद्याव व क्रिडांगणात गेल्या काही महिन्यापासून होत असलेला त्रास पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात महानगरपालिकेने एकेकाळी शाळेसाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर उद्यान व क्रिडांगणाची निर्मिती केलेली आहे. या तानाजी मालुसरे क्रिडांगणाला व जिजामाता उद्यानाला गेल्या काही महिन्यापासून बकालपणा येवून एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या उद्यान व क्रिडांगणाची दुरावस्था हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या संबंधितांकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या उद्यानाच्या वरूणा व एव्हरग्रीन सोसायटीच्या बाजूने असलेले उद्यानाचे व क्रिडांगणाचे दरवाजे तुटून गळून पडलेले आहेत. येथील लहान मुलांची खेळणी नावाला असून या खेळण्यांची थडगी झाली आहेत. लहान मुलांचे झोपाळे पूर्णपणे तुटलेले आहेत. त्याचा खेळण्यासाठी काहीही वापर होत नाही , तर तो सांगाडा काय स्वच्छ भारत अभियानात दाखविण्यासाठी पालिका प्रशासनाने ठेवला आहे काय? तीच अवस्था लहान मुलांच्या खेळण्यातील बदकाची आहे. त्यातील एक बदक नाहीसा झालेला आहे. पालिका प्रशासनाकडून काहीही कार्यवाही न झाल्याने बदकाचे खेळणे जागेवरून निखळून बाजूलाच पडलेले असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी तक्रारपत्रात म्हटले आहे.
उद्यानात उंदरांनी ठिकठिकाणी खड्डे घेतले असून उद्यान व क्रिडांगणाला सुरक्षा रक्षक देण्यात आलेला नाही. उद्यान व क्रिडांगणात मोकाट व भटकी कुत्री वावरत असून लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे, भुंकणे असे प्रकार दररोज घडत आहेत. तसेच उद्यान व क्रिडांगणात परिसरातील रहीवाशी त्यांची पाळीव कुत्री फिरावयास आणत असून ज्या ठिकाणी मॉर्निग वॉकसाठी लोक ये-जा करतात, त्याच मार्गावर कुत्र्यांचे शौच पहावयास मिळते. सुरक्षा रक्षक ठेवल्यास उद्यानात फिरणाऱ्या महिला व मुलींना सुरक्षिततताही प्राप्त होईल. मॉर्निग वॉकसाठी लोक ये-जा करतात, तेथील लाद्याही उखडल्या गेल्या आहे. या मॉर्निग वॉकच्या लाद्याही तुटलेल्या असतील तेथे नव्याने बसविण्यात याव्यात. स्थानिक रहीवाशी मॉर्निग वॉक करताना शौचालयाच्या मागील बाजूने जातात, त्यावेळी दुर्गंधी टाळण्यासाठी नाकावर रूमाल ठेवावा लागतो. शौचालयातून येणारी दुर्गंधी बंद होणे आवश्यक आहे. उद्यान व क्रिडांगणाच्या दुरावस्थेबाबत आपण तातडीने उपाययोजना करून तेथील बकालपणा हटवावा. झोपाळा व बदकाची दुरूस्ती, तुटलेल्या दोन्ही प्रवेशद्वाराची दुरूस्ती करण्यात यावी, उद्यानात सुरक्षारक्षक उपलब्ध करून द्यावा. भविष्यात महिलांची छेडछाड, विनयभंग अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना उद्यान व क्रिडांगणाची दुरावस्था हटवून बकालपणा घालविण्यासाठी व सुविधा तातडीने पुरविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
तक्रारपत्रे आपल्या कार्यालयातून केवळ फॉरवर्डही केली जातात. पण या दोन महिन्यात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जंगली गवत, तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार, बकालपणा आजही कायम आहे. निवेदन फॉरवर्ड करू नका. तर येवून भेट द्या. खरी परिस्थिती समजण्यास मदत होईल, असे सांगत संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांना उद्यान व क्रिडांगणाच्या पाहणीसाठी भेटीचे निमत्रंण दिले आहे.