स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने गृहनिर्माण सोसायट्यांचा कचरा न उचलल्यास रहीवाशी हा कचरा स्वत: नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणून टाकण्याचा इशारा नेरूळ सेक्टर चारमधील सिडको सोसायटीतील रहीवाशांकडून देण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर चारमधील सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्यांना पत्र देण्यात आले असून सोसायटी आवारावतील कचऱ्याची सोसायटी आवारातच कंपोस्ट पिट अथवा कचरा रॅकच्या माध्यमातून विल्हेवाट लावून खत निर्मिती करण्याविषयी निर्देश देण्यात आले आहे. सोसायटी आवारात कोठेही रिकाम्या जागा राहील्या नसून वाहनेच रस्त्यावर उभी करावी लागत आहे. कचरा रॅक ठेवण्यास अथवा खोदकामासाठी जागा नसल्याने तसेच सोसायटी आवारात कचऱ्याची दुर्गंधी सहन करण्यास रहीवाशी तयार नसल्याने महापालिका प्रशासनाने कर घेताय तर सुविधा देण्याचीही जबाबदारी उचलावी असा संतप्त सूर यावेळी नेरूळ सेक्टर चारमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहीवाशी व पदाधिकाऱ्यांकडून चर्चेदरम्यान उघडपणे आळविण्यात आला.
कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. खत तयार करण्याचे निर्देश देणारीू महापालिका स्वत:च्या अवाढव्य असणाऱ्या डम्पिंगग ग्राऊंडवर खतनिर्मिती का करत नाही, कर जमा करते तर मग कचरा का घेवून जात नाही. खासगी कचरासंकलक कचरा घेवून जाण्यास तयार आहेत, महापालिका नकार देत आहे, याचाच अर्थ महापालिका प्रशासनातील अधिकारी व खासगी कंचरा संकलकांचे आर्थिक साटेलोटे असण्याचा आरोपही स्थानिक रहीवाशी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
स्थानिक रहीवाशी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. कचरा गुमान उचला. कर भरतोय ना, नाही उचलला तर मुख्यालयाबाहेर आणून टाकू असा इशाराही रहीवाशी व पदाधिकाऱ्यांनी दिला. नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष व स्थानिक रहीवाशी रविंद्र सावंत यांनीही यावेळी रहीवाशांना मार्गदर्शन करत पालिका प्रशासनाला आपण एकत्रितपणे निर्णयाचा फेरविचार करण्यास भाग पाडू असे रविंद्र सावंत यांनी रहीवाशांना सांगितले.
या बैठकीला अशोक महाजन, कॅप्टन रमेश सिंग, वेणु गोपाल, धावडे, शंकर सद्यावर्थे, बालाजी होगाडे, पंकज रणालकर, अभंग, टायटस जोसफ, सुनील पुजारी, धिरेन म्हेता, रमेश जेस्वानी, इंदरसिंग ठाकूर, नितीन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. कचरा संकलन विषयावरून नेरूळ सेक्टर चारमधील रहीवाशांनी आपला उद्रेक व्यक्त केला असून हळुहळू हे लोण नवी मुंबईत पसरण्याची शक्यता आहे.