स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbialive.com@gmail.com
नवी मुबंई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात असांसर्गीक रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक कर्करोग दिनानिमित्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील वैद्यकिय अधिकारी, कनिष्ठ वैद्यकिय अधिकारी, ए. एन. एम., एल. एच. व्ही. व एच. अे. यांना वेब संवाद प्रणालीव्दारे कर्करोगाविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे कर्करोग विषयक जनजागृतीपर पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या कर्करोगाविषयी जनजागृतीपर मोहिमांचे आयोजन करण्यात आले.
कर्करोगामध्ये प्रामुख्याने गर्भाशयाचा कर्करोग, स्तन कर्करोग, मुखाचा कर्करोग याचे प्रमाण अधिक आहे. त्यादृष्टीने सार्वजनिक रुग्णालय वाशी व नेरुळ येथे कर्करोग तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये संशयीत कर्करोग रुग्णांचे मोफत पीएपी स्मेअर घेण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या रुग्णालयांमध्ये दैनंदिन बाह्यरुग्ण सेवेअंतर्गत संशयीत कर्करोग असल्यास पीएपी स्मेअर घेण्यात येत असते.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांना कर्करोगाविषयीची सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात जनजागृतीपर हस्तपत्रके व पोस्टर्सचे वाटप करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका व हार्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविषयक जनजागृती, तंबाखू वापरामुळे होणाऱ्या हानीचे प्राथमिक ज्ञान व त्याच्या दुष्परिणामांची माहिती देण्याबाबत वार्षिक मोहिमेचा प्रारंभ अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूच्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी व्यापक स्वरुपात समुपदेशन करण्यात येत आहे आहे.
तरी तंबाखू, सुपारी, विडी, सिगारेट, खर्रा, दारु इत्यादी पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला होणाऱ्या अपायापासून नागरिकांनी दूर रहावे. या पदार्थांचे सेवन करत असलेल्या नागरिकांनी आपल्या नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच काही लक्षणे जाणवल्यास सार्वजनिक रुग्णालय वाशी अथवा नेरुळ येथे जावून कर्करोगाची तपासणी करुन घ्यावी. जेणेकरून लवकर निदान होवून योग्य तो प्रतिबंधात्मक उपचार करणे शक्य होईल असे आवाहन करण्यात येत आहे.