स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राजकारणामध्ये नवी मुंबई शहरात संस्थानिक पध्दत वाढीस लागल्याने एकाच घरात दोन ते तीन नगरसेवक पहावयास मिळू लागले आहेत. तसेच मी नाहीतर माझी बायको नगरसेवक आणि ठेकेदार माझा मुलगा ही नगरसेवकांची मानसिकता झाल्याने कार्यकर्तेही इतर आश्रय शोधू लागले आहेत. गोवा विधानसभा निवडणूकीत भाजपचे तेथील श्रध्दास्थान असलेल्या पर्रिकरांच्या मुलालाही हव्या असलेल्या मतदारसंघात तिकिट न मिळाल्याने भाजप पक्ष मोठा आहे, नेते नाही हा संदेश गेला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूकीत येथील आयाराम-गयारामांची पार्श्वभूमी व नेत्यांनी पक्ष सोडल्यावर त्या पक्षाला पडणारे खिंडार ही पार्श्वभूमी लक्षात घेवून नवी मुंबई महापालिका निवडणूकीत एकाच घरात अधिक तिकिट देणार नाही व नेत्यांना नाही तर कार्यकर्त्यांना तिकिट वाटपात प्राधान्य असणार याची कुणकुण लागल्यानर राष्ट्रवादीतून भाजपात आलेले नगरसेवक पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीशी घरोबा साधण्याच्या छुप्प्या हालचाली करू लागले आहेत. प्रभाग पुनर्रचनेनंतर अनेक नगरसेवक रूपी संस्थानिक परिवारात अडचणी निर्माण झाल्याने भाजपात मोठ्या प्रमाणावर नजीकच्या काळात पडझड होणार असल्याचे उघडपणे बोलले जात आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मातब्बर समजले जाणारे नेते गणेश नाईक यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी गणेश नाईकांना हमखासपणे ऐरोली व बेलापुर अशा दोन विधानसभेच्या तिकिट मिळणार असे नाईक समर्थकांकडून छातीठोकपणे सांगितले जात होते. परंतु भाजपने नाईक परिवाराला एकच तिकिट, तीही ऐरोली मतदारसंघातले संदीप नाईक यांना तिकिट दिली. गणेश नाईकांना तिकिट नाकारण्यात आली. संदीप नाईकांनी आपले तिकिट गणेश नाईकांना देवू केले. जिथे गणेश नाईकांसारख्या मातब्बर नेतृत्वाचे तिकिट भाजप नाकारते, तिथे नगरसेवकांचे तिकिट नाकारायला किती वेळ लागणार, भाजपात नेत्यांना नाही तर कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाते. एकाच घरात दोन तिकिट भाजप देणार नसल्याचे उघडपणे भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून बोलले जावू लागले आहे. शेवटच्या क्षणी एकाच घरात दोन तिकिट न मिळाल्यास धावपळ कशी करायची यामुळे दोन ते तीन तिकिटाची तजवीज करत भाजपचे अनेक नगरसेवक नवा घरोबा करण्यासाठी अन्यत्र चर्चा करू लागले आहेत.
खाडीशी जवळीक असलेल्या व भाजपमध्ये कालपरवा आलेल्या एका नगरसेवकांने तब्बल सहा तिकिटवर दावा केला आहे व आपल्या नेत्याला सहा तिकिट न दिल्यास आम्ही पक्ष सोडणार असे त्या नेत्याचे कार्यकर्ते उघडपणे बोलले जावू लागले आहे. नेरूळ पूर्व आणि पश्चिम भागातील काही संस्थानिकांनाही आपल्या घरात दोन ते तीन तिकिट हव्या आहेत., दिघा ते बेलापुरदरम्यान गेल्या काही वर्षात नाईकनिर्मित संस्थानिकांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा वाढीस लागली आहे. मी, माझी बायको, माझा मुलगा आणि माझे घर यापलिकडे निवडणूकीच्या तिकिटीमध्ये नाईक निर्मित तसेच नाईकांनी आजवर राजकारणात पोसलेले हे संस्थानिक कार्यकर्त्यांचा व पक्षाचा विचार करत नसल्याचे नवी मुंबईकरांनी गेल्या काही वर्षात जवळून पाहिले आहेत. नाईकनिर्मित काही संस्थानिक नाईकांची साथ सोडून अन्यत्र राजकीय संसार करत असल्याचे दिघा, ऐरोली, तुर्भे तसेच एमआयडीसी व अन्यत्र पहावयास मिळत आहे. भाजपमध्ये निवडणूकीची तिकिटे पक्ष निश्चित करतो, कामे तपासून गुणवत्ता निश्चित करतो. मात्र नवी मुंबईत १२२ प्रभागांमध्ये सर्वच तिकिट निश्चित झाल्याच्या थाटात वावरू लागल्याने पक्षाला विचारतोय कोण हे चित्र येथील भाजपविषयी निर्माण झाले असुन नवी मुंबईतील या घडामोडींची भाजपकडून वरिष्ठ पातळीवर केव्हाच दखल घेण्यात आली असून निवडणूकीच्या तिकिट वाटपात ‘दे धक्का’चे समीकरण भाजपकडून वापरले जाण्याची दाट शक्यता आहे. भाजप एकाच घरात दोन तिकिट देणार नसल्याचे वरिष्ठ पातळीवरून निश्चित झाल्याने संस्थानिकांनी नाईकांवरिल आपले राजकीय स्वार्थासाठी असलेल्या प्रेमाला बासनात गुंडाळून नवा राजकीय संसार उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नाईकांना आजही नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर जनाधार असला तरी नाईकांनी निर्माण केलेले संस्थानिक व संस्थानिकांचा मनमानी कारभार, भ्रष्टाचार आणि ठेकेदारांनी सांभाळलेली संस्थानिकांची गणिते यामुळे संस्थानिकांवरील नाराजी नाईकांना त्रासदायक ठरू लागली आहे. संस्थानिकांचे लाड पुरविताना त्या त्या विभागातील आपल्या निष्ठावंतांवर होत असलेला अन्याय नाईकांपर्यत पोहोचला न गेल्याने कार्यकर्तेही चर्चगेट, कळव्याकडे आपले प्रेम वळवू लागले आहेत. भाजपकडे परप्रातियांचे असलेले एकगठ्ठा मतदान, सुशिक्षितांचा भाजपकडे असलेला कल आणि मोदी नावाचे वलय यामुळे भाजपचे वरिष्ठ येथील संस्थानिकांना भीक न घालता एका तिकिटावर राहा नाहीतर कायर्कर्त्यांना संधी देण्याची मानसिकता करू लागले आहेत. भाजप एकाच घरात अधिक तिकिट देणार नसल्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असल्याने संस्थानिकांना आपली महत्वाकांक्षा टिकविण्यासाठी कमळाला येत्या काळात सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ReplyForward |