स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका नवीन पुनर्रचनेतील प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे गावातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांच्या लसीकरणासाठी घरटी अभियान राबविण्याची मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमी पॅनल पध्दतीसाठी प्रशासनाने निर्माण केलेल्या प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गाव या परिसराचा समावेश होत आहे. नवी मुंबई शहर महापालिका प्रशासनाच्या अथक परिश्रमामुळे कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. १८ वर्षे वयोगटावरील अधिकांश रहीवाशांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. शाळा व महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्याही लसीकरणाचा पहिला टप्पा जवळपास संपला आहे. तथापि १५ ते १८ वर्षे वयोगटातीळ जी मुले शालाबाह्य आहेत, त्या मुलांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात जावून लसीकरण करून घ्यावे अशी कार्यप्रणाली महापालिका प्रशासनाने निश्चित केलेली आहे. नापास झाल्यामुळे अथवा अन्य काही कारणास्तव शाळा सोडावी लागलेल्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. कारण सर्वांचेच लसीकरण झाल्याशिवाय कोरोनामुक्तीचे ध्येय साकार होणार नाही. महापालिका प्रशासनाने प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गाव या परिसरात घरटी सर्व्हे करून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींची यादी बनवून त्यांचे लसीकरण करावे. शाळाबाह्य मुलांना व त्यांच्या पालकांना नागरी आरोग्य केंद्रात त्यांच्यासाठी लसीकरण केले जात आहे, याची अजूनही माहिती नाही. पालिका प्रशासनाकडून जनजागृतीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण संबंधित मुला-मुलींसाठी घरटी सर्व्हे अभियान राबवून त्यांच्या लसीकरणासाठी विशेष अभियान राबविण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.