स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गाव, साईबाबा हॉटेल चौक, सारसोळे बसडेपो चौक, श्री गणेश रामलीला मैदानासभोवतालचे अनधिकृत बॅनर तातडीने हटविण्याची लेखी मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर सहा, आठ, दहा आणि साररसोळे गाव, कुकशेत गाव या परिसरात बाराही महिने अनधिकृत बॅनर मोठ्या संख्येने लागत असतात. विशेष म्हणजे महापालिकेचा अतिक्रमण विभाग दररोज या अनधिकृत बॅनरवर कारवाई करत नसल्याने कार्यक्रम संपल्यावरही अनेक दिवस बॅनर लागलेलेच असतात. नेरूळ सेक्टर सहामधील बाहेरील व अंर्तगत रस्ते, सारसोळे गावातील बाहेरील व आतील रस्ते, नेरूळ सेक्टर आठ व दहामधील बाहेरील तसेच आतील रस्ते, सारसोळे डेपो चौक, साईबाबा हॉटेल चौक, रामलीला मैदान तसेच त्या मैदानासमोरील रस्ता ही ठिकाणे बाराही महिने महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाच्या उदासिनतेमुळे अनधिकृत बॅनरचे माहेरघर बनली आहेत. पालिका प्रशासनाचा अनधिकृत बॅनरमुळे लाखो रूपयांचा महसूल बुडत असताना महापालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग अनधिकृत बॅनरला आश्रय देत आहे. कोणत्याही राजकारण्याचा मुलाहिजा न बाळगता दररोज अतिक्रमण विभागाने अनधिकृत बॅनरवर कारवाई केल्यास पालिकेची परवानगी घेवून व महसूल भरून बॅनर लावले जाती. आपण प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील तसेच साईबाबा चौक, सारसोळे बसडेपो चौक, रामलीला मैदान परिसरातले अनधिकृत बॅनर तातडीने हटविण्याचे आणि दररोज अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे अतिक्रमण विभागाला आदेश देण्याची मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
स्वच्छ भारत अभियानामध्ये अथक प्रयत्न करूनही महापालिकेला पर्यायाने या शहराला आजतागायत प्रथम क्रमांक मिळालेला नाही. सतत दुसऱ्या अथवा तिसऱ्या क्रमाकांवर समाधान मानावे लागत आहे. विनापरवानगी लागणाऱ्या अनधिकृत बॅनरमुळे महापालिका प्रशासनाचा महसूल बुडत आहे आणि शहराला बकालपणा येत आहे आणि याला जबाबदारही महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाची उदासिनता अथवा कामचुकारपणा आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे महापालिका प्रशासनाला अधिकार आहेत. परंतु बाराही महिने मोठ्या प्रमाणावर प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० आणि सारसोळे व कुकशेत गावातील तसेच साईबाबा चौक, सारसोळे बसडेपो चौक, रामलीला मैदान परिसरात अनधिकृत बॅनर राजरोसपणे लागत असताना महापालिका प्र्रशासन फौजदारी गुन्हे दाखल करण्यास कुचराई का करत आहे, महापालिका प्र्रशासनाचा स्थानिक अतिक्रमण विभाग राजकारण्यांच्या अनधिकृत बॅनरला खतपाणी का घालत आहे, तेच समजत नाही. या परिसराला वेळोवेळी भेट दिल्यास अनधिकृत बॅनर आढळून येतील. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे महापालिका प्रशासनाने दाखल करावेत आणि अनधिकृत बॅनरला खतपाणी घालणाऱ्या तसेच कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या स्थानिक महापालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.