स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील महापालिकेने नुकत्याच बांधलेल्या प्रवेशद्वारालगतच्या गटारावरील तुटलेल्या लोखंडी पत्र्यांच्या झाकणांची डागडूजी तातडीने करण्याची लेखी मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सध्या महापालिका प्रशासनाकडून सारसोळे गावातील अंर्तगत रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. हे काम आपल्या प्रशासकीय राजवटीत होत असल्याने तसेच महापालिकेचे पाचवे सभागृह संपुष्ठात येवून जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटल्याने सिमेंट कॉक्रीटीकरणाच्या कामाचे श्रेय पूर्णपणे आपलेच आहे. कोणी राजकारणी या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असेल तर त्यामागे त्या राजकीय घटकाचा निश्चितच काहीतरी स्वार्थ असेल. जनता हुशार आहे. प्रशासकीय राजवट महापालिकेत कधी लागू झाली याची त्यांना पूर्णपणे कल्पना असल्याचे सांगत समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी सारसोळे गावात सुरू असलेल्या रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरणाबाबत महापालिका आयुक्तांचे आभार मानले आहेत.
सारसोळे गावात कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावर हरीलिला सोसायटी ते महापालिकेने बांधलेले प्रवेशद्वार यादरम्यान सिमेंट कॉक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून हरिलीलापासून सुरू झालेले काम आता सारसोळे गावातील कोळीवाड्यामधील होळी मैदानालगत आलेले आहे. परंतु सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे रस्ते आणि रस्त्यालगत असणारी गटारांवरील गेल्या काही वर्षापासून तुटलेली झाकणे हे चित्र नजीकच्या काळात निश्चितच महापालिका प्रशासनाला भूषणावह नाही. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील सारसोळे गावच्या प्रवेशद्वारालगतच असलेल्या रस्त्यावरील गटारांची पत्र्याची झाकणे गेल्या अनेक वर्षापासून तुटलेली आहेत. पण या गटारांची डागडूजी करण्यास महापालिका प्रशासनाने व पाठपुरावा करण्यासाठी कोणत्याही राजकारण्यांनी प्रयत्न करू नयेत, ही खरोखरीच येथील रहीवाशांसाठी दुर्देवाची बाब आहे. येथील गटारावरील झाकणे तुटलेली असल्याने येथून ये-जा करणाऱ्या सारसोळेच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना डासांचा व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या तुटलेल्या झाकणामुळे रस्त्याला बकालपणा आला असून अनेक जण ती तुटलेली पत्र्याची झाकणे निदर्शनास न आल्याने त्यात अडखळून पडलेले आहेत. त्यांना जखमाही झालेल्या आहेत. आपणास या निवेदनासोबत गटारावरील झाकणांची छायाचित्रे जोडत आहोत. संबंधितांना सिमेंट कॉंक्रीटीकरणाचा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच ती झाकणे तातडीने बदलण्याविषयी निर्देश देवून तेथून ये-जा करणाऱ्या सारसोळेच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना दिलासा प्राप्त करून द्यावा, अशी मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.