बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com
स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई : कोरोना महामारीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक दोन वर्षे लांबणीवर पडलेली आहे. महापालिका निवडणूका लांबणीवर पडल्याने प्रस्थापितांसह निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांच्या खिशाला पर्यायाने तिजोरीला चांगलाच दणका बसला आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे बोलले जावू लागल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवू पाहणाऱ्या प्रस्थापितांसह मातब्बर इच्छूकांच्या पायाखालची वाळू सरकण्यास सुरूवात झाली आहे. महापालिका निवडणूकीत तिकिट नाकारले जाणारी इच्छूक मंडळी महापालिका निवडणूकीनंतर दीड वर्षाने होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आपला हिशोब चुकता करण्याची भीती वाटणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका लढवू पाहणाऱ्यांना लांबणीवर पडलेली निवडणूक महागात पडणार असल्याचे नवी मुंबईच्या राजकारणात बोलले जावू लागले आहे.
१९९९, २००४,२००९, २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचा आढावा घेतल्यास यापूर्वीच्या होणाऱ्या लोकसभा निवडणूका या एप्रिल महिन्यात झाल्या होत्या आणि त्यानंतर सहा महिन्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. लोकसभा निवडणूकीनंतर पाच वर्षांनी आणि विधानसभा निवडणूकीनंतर साडे चार वर्षांनी नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असे. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत प्रभागाप्रभागातील महापालिका निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांनी आपले काम करावे यासाठी नेतेमंडळींकडून एकाच प्रभागात तीन ते चार जणांना पालिका निवडणूकीच्या तिकिटीचे ‘गाजर’ दाखविले जात असे. महापालिका निवडणूका वर्षांनी, सहा महिन्यांनी होणार असल्याने व महापालिका निवडणूकीत तिकिटीवर आपला दावा प्रबळ करण्यासाठी पालिका निवडणूका लढवू पाहणारी इच्छूक मंडळी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करत असतात. परंतु निवडून आल्यावर अथवा पराभूत झाल्यावर लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील घटक आपल्या विजयासाठी काम करणाऱ्या या पालिका निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छूकांचा गांभीर्याने विचार न करता आपल्या जवळच्या घटकालाच पालिका निवडणूकीत तिकिट देण्यासाठी आपले राजकीय वजन पणाला लावत होते. त्यामुळे अन्य नाराज मंडळी शांत बसत असे. कारण पालिका निवडणूकीनंतर लोकसभा व विधानसभा निवडणूका तब्बल चार ते साडे चार वर्षे लांबणीवर असल्याने तिकिट नाकारल्याची आपली नाराजी नेतेमंडळींचे चार ते साडे चार वर्षे काहीही वाकडे करू शकत नसल्याचा राजकीय विचार करून शांत बसत असे. परंतु कोरोना महामारीमुळे नवी मुंबईतील राजकीय गणिते बदलण्यास सुरूवात झाल्याने आणि लोकसभा-विधानसभा निवडणूका व पालिका निवडणूकीतील कालावधी दोन वर्षांनी कमी झाल्यामुळे पालिका निवडणूकीत तिकिट नाकारल्याचा वरिष्ठांवर वचपा काढण्याची संधी नाराजांना अडीच ते तीन वर्षातच उपलब्ध होणार आहे.
अनेकदा निवडून आलेल्यांनाच पुन्हा पालिका प्रभागात तिकिट मिळत असल्याने व कितीही प्रयत्न केले तरी प्रस्थापितांचे तिकिट कापणे शक्य नसल्याने लोकसभा व विधानसभा निवडणूकीत कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी आपल्या उमेदवाराचे गांभीर्याने काम करत नसतात. कारण कितीही प्रामाणिकपणे काम करूनही पालिका निवडणूकीत तिकिट मिळणार नसल्याने ‘फुकटचे कशासाठी राबायचे’ असा राजकीय भाषेतील सोयिस्कर विचार करून कार्यकर्ते व पदाधिकारी अंतकरणापासून प्रचारात सहभागी होत नसतात. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत आपला कार्यभाग साधण्यासाठी सर्वच पक्षाचे वरच्या श्रेणीतील मातब्बर नेतेमंडळी एकाच प्रभागात चार ते पाच जणांना पालिका निवडणूकीतील तिकिटाचे गाजर दाखवून प्रभागात कोंबड्या झुंजवून व वेळ पडल्यास आपल्याच पक्षातील प्रस्थापिताला होणाऱ्या त्रासाकडेही कानाडोळा करत असत. मात्र ऑक्टोबर-नोव्हेबरमध्ये होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीचे पडघम २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत उमटण्याची शक्यता आताच निर्माण झाली आहे. तिकिट वाटपात नाकारल्याचे गेल्याचा व आजवर वापर करून पालिका निवडणूकीत डावलले गेल्याचा वचपा ही नाराज मंडळी नक्कीच लोकसभा व विधानसभा निवडणूकीत काढण्याची भीती त्या त्या पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींना आताच वाटू लागली आहे. त्यामुळे पालिका निवडणूकीत तिकिट वाटपात डावलले गेल्यास पूर्वीसारखे कार्यकर्ते विसरून जातील ही घोडचूक नेतेमंडळींना महागात पडणार आहे. कारण नेतेमंडळींनी डावलल्यास संबंधितांना आपल्या घरच्यांच्या तसेच जवळच्या मित्रमंडळींना, सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना तोंड दाखविणे संबंधितांना अवघड होवून बसते आणि या सर्वांचा उद्रेक आगामी निवडणूकीत पहावयास मिळण्याची भीती नेतेमंडळी खासगीत बोलताना व्यक्त करु लागली आहेत.