नवी मुंबई : नेरूळ सेक्टर चार येथील सांगर संगम सोसायटीच्या बाजूचा कॉर्नर वाधवा टॉवरसमोर पेट कॉर्नरची निर्मिती करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शहरामध्ये पेट कॉर्नरची उद्यानामध्ये तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी निर्मिती करत आहे. पावसाळ्यानंतर या कामाला गती मिळणार आहे. नेरूळ सेक्टर चार परिसरात सागर संगम सोसायटीच्या बाजूला वाधवा टॉवरसमोरील पदपथावर पेट कॉर्नरची निर्मिती करणे आवश्यक आहे. या पदपथावर सकाळ – संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. ज्येष्ठ नागरिकांना पदपथावर चालताना त्यांना श्वानाचा व अन्य पाळीव प्राण्यांच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पदपथावर चालताना पाळीव प्राण्यांच्या शौचाच्या दुर्गंधीमुळे आजाराचा सामना करावा लागत आहे. ज्येष्ठांना यामुळे शारीरीक व्याधीचा त्रासही जडला आहे. त्यामुळे स्थानिक जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने नेरूळ सेक्टर चार परिसरात पेट कॉर्नरची निर्मिती करण्यात यावी. यासंदर्भात नेरूळ सेक्टर चार, दोन व जुईनगर नोडमध्ये पालिका अधिकाऱ्यांसमवेत आम्ही पाहणी केलेली आहे. संबंधित ठिकाणाबाबत आपण आम्हाला घेवून पाहणी अभियान राबवावे. नेरूळ सेक्टर चार येथील आम्ही उल्लेख केलेल्या ठिकाणी व जुईनगर नोडमध्ये पेट कॉर्नरबाबत तातडीने कार्यवाही करावी. पेट कॉर्नर बसविण्यापूर्वी आपण पाहणी अभियान राबवून स्थानिक रहीवाशांशी चर्चा करावी. नेरूळ सेक्टर चार मध्ये उपरोक्त ठिकाणी लवकरात लवकर पेट कॉर्नरची निर्मिती करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी केली आहे.