नवी मुंबई : प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २, ३, ४, ८ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करण्याची लेखी मागणी भाजपचे सानपाडा नोडमधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २, ३, ४ , ८ या परिसराचा समावेश होत आहे. या ठिकाणी सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या, टॉवर व छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांही आहेत. येथे अल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशी राहतात. महापालिका प्रशासनाकडून बाहेरील भागातील, रस्त्यावरील मल:निस्सारण वाहिन्यांची व चेम्बर्सची नेहमीच सफाई होते. पण सोसायटी अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई न झाल्याने वेगळीच समस्या निर्माण होते व स्थानिक रहीवाशांना सांडपाण्याच्या , मैलाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागून आरोग्यविषयक समस्याही निर्माण होतात. अंर्तगत मल:निस्सारण वाहिन्यांची समस्या निर्माण झाली तरी रहीवाशी आमच्याकडे व आम्ही पालिकेकडे पाठपुरावा करतो. सिडको सोसायट्यांमध्ये राहणारे रहीवाशी नवी मुंबई महापालिकेचे करदाते आहेत. त्यांना सुविधा पुरविणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. महिन्यातून किमान एकदा तरी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई होणे आवश्यक आहे. आतून व बाहेरून मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई झाल्यास दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही. पालिका प्रशासनाकडेही फारशा तक्रारी येणार नाहीत. आपण प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २, ३, ४, ८ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यात यावी व तसे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी केली आहे.