अनंतकुमार गवई
नवी मुंबई : आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरामध्ये वाचन संस्कृती वृध्दींगत व्हावी व शहराचा वैचारिक विकास व्हावा यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात १९ अद्ययावत ग्रंथालये महानगरपालिकेमार्फत सुरु असून त्यामध्ये एक लाखाहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
नवी मुंबईची ओळख नॉलेज सिटी म्हणूनही असून या उपमेला साजेसे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय नवी मुंबईत असावे या भूमिकेतून सिटी लायब्ररी म्हणून ओळखली जाईल अशाप्रकारचे अद्ययावत ग्रंथालय सानपाडा, सेक्टर ११ येथे उभारले जात आहे. नवी मुंबईचे भूषण ठरणारी आणखी एक वास्तू या ग्रंथालयाच्या रुपाने शहरात उभारली जावी यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक घेत या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या उभारणीबाबत विस्तृत चर्चा केली.
जुईनगर रेल्वे स्टेशननजीक, सेक्टर ११, सानपाडा येथे प्लॉट क्र. १ सिडकोकडून महानगरपालिकेस ग्रंथालयाकरिता हस्तांतरित झाला असून याठिकाणी चार मजली ग्रंथालय उभारण्यात येत आहे. ग्रंथालय इमारत उभारताना जगभरातील आधुनिक ग्रंथालय इमारतींच्या वास्तूंचा अभ्यास करून इतरांपेक्षा वेगळ्या स्वरुपाची पाहण्यासाठी यावेसे वाटेल व तिथे बसून वाचावेसे वाटेल अशा प्रकारची आकर्षक ग्रंथालय वास्तूरचना करावी असे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. वास्तूविशारद यांनी सादरीकरणाव्दारे दाखविलेल्या विविध दालनांच्या रचनेवर सविस्तर चर्चा करत त्यामध्ये आयुक्तांनी सुयोग्य बदल सूचविले.
या ग्रंथालय इमारतीत नवी मुंबई क्षेत्रातील विविध भाषिक नागरिकांचा विचार करून मराठी व इंग्रजी भाषेप्रमाणेच विविध भाषेतील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत तशा प्रकारची वैविध्यपूर्ण दालने या इमारतीमध्ये असावीत असेही आयुक्तांनी सूचित केले.
वाचनासाठी ग्रंथ उपलब्धतेप्रमाणेच त्याठिकाणी साहित्य विषयक उपक्रम साजरे करण्यासाठी प्रेक्षागृहासह रंगमंच उपलब्धता, ग्रंथ व सांस्कृतिक प्रदर्शनासाठी वैशिष्ट्यपूर्ण दालन व्यवस्था, ग्रंथरचनेचा इतिहास प्रदर्शित करण्यासाठी नाविन्यपूर्ण रचना, दिव्यांगांना ग्रंथालयात सहजपणे वावरता यावे अशा प्रकारची सुविधा, अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकांची सुविधा, मोकळ्या वातावरणात हिरवळीवर वाचन करता यावे अशी व्यवस्था – अशा विविध बाबींचा या ग्रंथालयामध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
वाचन संस्कृतीमध्ये कालानुरुप होत असलेले बदल लक्षात घेऊन या अद्ययावत ग्रंथालयात ऑडिओ लायब्ररी, ई लायब्ररीची अत्याधुनिक स्वरूपाची व्यवस्था करण्याबाबतही आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. ग्रंथालय वास्तू उभारताना ही वास्तू पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डींग म्हणूनच उभारली जावी अशाप्रकारे वास्तूरचना करण्याचे निर्देश देत ही इमारत कार्बन न्युट्रल असावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. यादृष्टीने सदर वास्तूत प्रकाश आणि हवा खेळती रहावी अशाप्रकारे वास्तू विशारदांनी केलेल्या रचनेची आयुक्तांनी प्रशंसा केली. येथे येणाऱ्या वाचकांसाठी पुरेशी वाहनतळ व्यवस्था करणेबाबतही आयुक्तांनी सूचना केल्या.
या बैठकीमध्ये वास्तूविशारदांनी त्यांच्या वास्तूरचनेच्या संकल्पना मांडणारे सादरीकरण केले. त्यावर सविस्तर विचारविनीमय करण्यात आला. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई उपस्थित होते. सदर वास्तू उभारताना त्यामध्ये लेट्स रिड फाऊंडेशन या व्यापक वाचन चळवळ राबविणाऱ्या नामांकित संस्थेचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. नवी मुंबई शहराला या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियोजित सेंट्रल लायब्ररीमुळे वाचन संस्कृती जपणारे शहर म्हणून नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.