सुनिता हांडेपाटील यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
शैलेंद्र शिर्के : Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिका परिवहन उपक्रमाचा बस क्रं ४ व ८ मध्ये कोपरखैराणे सेक्टर २२ व २३ मधील अंर्तगत भागातील रहीवाशांच्या सोयीसाठी कोणताही बदल न करता पूर्वीप्रमाणेच ठेवण्याची मागणी भाजपच्या पदाधिकारी सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची बस क्रमांक ४ व ८ ही बस कोपरखैराणेच्या अंर्तगत भागातून सेवा देत असल्याने स्थानिक रहीवाशांच्या प्रवासासाठी ही सेवा जीवनवाहिनी बनली असून स्वस्त दरात त्यांना प्रवासी सेवा उपलब्ध होत आहे. कोपरखैराणे डी मार्ट चौकातून सेक्टर २३ मधील मल:निस्सारण केंद्र, सेक्टर २२ मधील माता बाल रुग्णालय, विजया बॅक, कोपरखैराणे तीन टाकी बसस्थानक या मार्गावरून अंर्तगत भागातून ये-जा करत असे. या पूर्णपणे निवासी वस्तीचा परिसर आहे. कोपरखैराणे वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश मुंढे यांनी वाहतुक कोंडीचे कारण सांगत ही बससेवा अंर्तगत भागातून न देता थेट डीमार्ट चौक ते थेट तीन टाकी बसस्थानक येथे सरळ रस्त्याने नेण्याचे जावक क्रं २०१-२०२२, दि. १९ जुलै २०२२च्या पत्रान्वये परिवहन उपक्रमाला कळविले. महापालिका परिवहन उपक्रमाने कौपरखैराणेमधील सेक्टर २२ व २३ मधील रहीवाशांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी कोणताही विचारविनिमय न करता थेट अंर्तगत भागातील बससेवाच बंद करण्याचा खऱ्या अर्थांने ‘तुघलकी’ निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही सुरू केली असल्याचे सुनिता हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
वास्तविक पाहता. कोपरखैराणे सेक्टर २२ व २३ हा पूर्णपणे श्रमिकांचा, अल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचा निवासी परिसर आहे. येथील रहीवाशांना डीमार्ट चौक बसथांबा अथवा तीन टाकी बस थांबा येथे जाण्यासाठी १५ ते २० मिनिटाची पायपीट करावी लागते. येथील रहीवाशांचा रोजगारासाठी वाशी तसेच ठाणे येथे जावे लागते. ही बससेवा बंद झाल्याने त्यांना नाहक रिक्षांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही खर्चिक बाब त्यांना परवडणारी नाही. वयोवृद्ध लोकांना आज तीन टाकी तसेच डीमार्ट बसथांब्यापर्यत पायपीट करावी लागत आहे. सेक्टर २२-२३ मध्ये निवासी परिसरात प्रवासी लोकसंख्या प्रचंड आहे. नवी मुंबई महापालिकेचे ते करदाते आहेत. त्यांना विश्वासात न घेता परिवहन उपक्रमाने बससेवेचा रूट बदली केला आहे. यामुळे स्थानिक जनतेचे हाल होऊ लागले आहेत. केवळ वाहतुक पोलिस निवेदन देतात व लगेच मार्ग बदली करण्याचा निर्णय होतो. हे काय आहे? स्थानिक करदात्या जनतेला विश्वासात न घेता मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतुक कोंडी हटविणे, बेशिस्त पार्क होणाऱ्या वाहनांना शिस्त लावणे हे वाहतुक पोलिसांचे कार्य आहे. ते त्यांचे कार्य न करता बससेवा मार्ग बदलण्याचे कळवितात आणि महापालिका परिवहन उपक्रम स्थानिक करदात्यांना अडचणीत टाकून मार्ग बदलण्यास तयार होते. महापालिकेच्या तिजोरीत स्थानिक करदात्यांमुळे निधी उपलब्ध होत असतो. वाहतूक पोलिसांमुळे होत नाही. आज प्रवासासाठी स्थानिक जनतेचे हाल होवू लागले आहेत. स्थानिक गोरगरीब जनतेला पायपीट करावी लागत आहे अथवा पन्नास – साठ रूपयांचा भुर्दंड येण्याजाण्यासाठी स्थानिकांना सहन करावा लागत आहे. वयोवृध्दांना उन्हात पायपीट करावी लागत आहे. हे कोठेतरी थांबणे आवश्यक आहे. वाहतुक कोंडी हटविणे वाहतुक पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यासाठी स्थानिकांसाठी उपयुक्त असलेल्या बससेवेचा मार्ग बंद करणे योग्य नाही. आज स्थानिक जनतेचे प्रचंड हाल होत आहे. वाहतुक कोंडी हटविणे वाहतुक पोलिसांचे कर्तव्य आहे आणि स्थानिक जनतेला बसची प्रवासी सुविधा देणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. आपण समस्येचे गांभीर्य जाणून घ्यावे आणि बसेवा सेक्टर २२-२३ मधील अंर्तगत भागातून पूर्ववत सुरू करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी सुनिता हांडेपाटील यांनी केली आहे.