सौ. सुवर्णा खांडगेपाटील : स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३
नवी मुंबई : कोरोना महामारीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक तब्बल सव्वा दोन वर्षे लांबणीवर पडली आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची घटीका समीप येते आणि नेमकी माशी कुठे शिंकते काय माहिती? पुन्हा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडतो. सव्वा दोन वर्षात असा प्रकार अनेकदा घडलेला आहे. परंतु नवी मुंबईतील राजकारणी हार मानणारे नाही. रणागंणावर गेल्या सव्वा दोन वर्षापासून ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांच्यातील उत्साह कोठेही कमी झालेला नसल्याने गेल्या सव्वा दोन वर्षाच्या कालावधीत निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कोरोना काळातील मदतीपासून ते कालपरवा स्वातंत्र्यांच्या ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने ध्वजारोहण वितरण कार्यक्रमालाही राजकारण्यांनी इव्हेंटचे स्वरूप दिले आहे. फोटोसेशन आणि प्रसिध्दीचा हव्यास यात नवी मुंबईतील राजकारणी राष्ट्रकुलच काय परंतु ऑलिम्पिकमध्येही निश्चितच सुवर्णपदक मिळवतील.
· एकेकाळी महापालिका निवडणूकांमध्ये भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. परंतु शिंदे गटाच्या निर्मितीमुळे काही पालिका प्रभागांमध्ये चित्र बदली होईल. नवी मुंबईत अन्य राजकीय संघटना कार्यरत असल्या तरी पॅनल सिस्टीममुळे त्यांचे खातेही उघडणे शक्य नाही. काही राजकीय संघटना लोकाभिमुख कार्य करून जनाधार वाढविण्याच्या फंदात न पडता केवळ दे निवेदन, दे आंदोलनाचा इशारा आणि त्या निवेदनाची बातमी, फोटो मिडियाला पाठवून सर, बातमी पाठवली आहे, मेलवर चेक करा, प्लीज असे करून बातम्या छापून आणतात आणि प्रसिध्दी मिळविण्यात धन्यता मानतात. यातच त्यांना समाधान लाभते. यापलिकडे त्यांची व त्यांच्या राजकीय संघटनेची घोडदौड नसल्याने प्रस्थापित राजकारणी असल्याचा प्रसिध्दीपुरत्या मर्यादीत असलेल्या राजकीय संघटनांची गांभीर्याने दखल घेत नाहीत. शिंदे गटाच्या निर्मितीमुळे पाच-सहा प्रभागांचा अपवाद वगळता नवी मुंबईतील महापालिका निवडणूकीमध्ये फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या निर्मितीमुळे नवी मुंबईतील शिवसेनेवर कोणताही फरक पडणार नाही. आमदार व स्थानिक त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी जरी शिंदे गटात सामील झाले असले तरी शिवसेनेचा खरा गाभा असलेला, कणा असलेला शिवसैनिक मात्र मातोश्रीवरील ठाकरेंसोबत असल्याने शिवसेना संघटना निश्चितच नजीकच्या काळात पुन्हा जोमाने उभी राहीलेली पहावयास मिळेल. नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आलेला शिवसैनिक मुंबईतून आलेला आहे. मातोश्रीवर आणि ठाकरे परिवारावर या शिवसैनिकांचे बेफाम प्रेम आहे. शिंदे गटाच्या निर्मितीमुळे उध्दव ठाकरेंना पर्यायाने शिवसेनेला ज्या पध्दतीने सत्तेवरून पायउतार व्हावे लागले, त्या घटनाक्रमामुळे राज्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. जे सोडून गेले आहेत, त्यातील अनेक आमदार पुन्हा निवडून येण्याची सुतरामही शक्यता नाही. या घटनाक्रमामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये उध्दव ठाकरेंप्रतीची सहानुभूती वाढीस लागली आहे.
नवी मुंबईच्या राजकारणाचा विचार करावयाचा झाल्यास भाजप हा येथील सर्वाधिक प्रभावशाली पक्ष आहे. त्याखालोखाल शिवसेना पक्ष आहे. बुडत्याला काडीचा आधार या न्यायाप्रमाणे शिवसेना जर बहूमताच्या जवळ येवून थांबल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉग्रेसमधून निवडून आलेल्या नगरसेवकांचा शिवसेनेला सत्तासंपादनात हातभार लागण्याची शक्यता आहे. अर्थात या जर-तरच्या गोष्टी आहे. नवी मुंबईत दोन्ही आमदार भाजपचे आहेत. अन्य राजकीय संघटनांच्या तुलनेत कोरोना महामारीच्या काळात सर्वांधिक कार्य भाजपने केलेले आहे, हे वास्तव कोणालाही नाकारून चालणार नाही. भाजपकडे लोकनेते गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, डॉ. संजीव नाईक, संदीप नाईक, विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील, सागर नाईक आणि जवळपास ५० मातब्बर आणि सहजगत्या निवडून येणाऱ्या माजी नगरसेवकांचा ताफा आहे. शिवसेनेतही ४० ते ४२ चेहरे हे मातब्बर व प्रभावी आहेत. या घटकांना नगरसेवक होण्यापासून कोणीही अडथळा आणू शकत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा आजचा विचार केल्यास निवडणूकीनंतर दोन आकडी संख्याबळ निवडून आणतानाही या दोन्ही कॉग्रेसची दमछाक होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेचे सत्तेचे सुकाणू आजवर नाईक परिवारानेच सांभाळलेले आहे. नाईक जिकडे, सत्ता तिकडे हे समीकरण १९९५ साली सभागृह अस्तित्वात आल्यापासून कायम आहे व येत्या काळातही या समीकरणात फारसा बदल होणार नाही. नाईकांच्या छावणीत लोकनेते गणेश नाईकांच्या सोबतीला डॉ. संजीव नाईक, संदीप नाईक, वैभव नाईक, सागर नाईक, वैशाली नाईक आदी फळी आहे. भाजपकडे असणाऱ्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कार्य व जनसंपर्क याचाही पालिका निवडणूकीत भाजपला लाभच होणार आहे. मंदाताई म्हात्रेंचे सर्वसामान्यांशी असणारा थेट संपर्क, दररोज शेकडोहून अधिक लोकांना मोबाईलच्या माध्यमातून मंदाताईंचा स्वत:हून असणारा संपर्क, सोशल मिडियावरील मंदाताईंची सक्रियता, व्हॉटसअपवरील चर्चेत सक्रिय सहभाग यामुळे अन्य प्रस्थापित राजकारण्यांच्या तुलनेत मंदाताईंशी संपर्क साधताना नवी मुंबईकरांना कोठेही संकोच वाटत नाही. मंदाताई स्वत: फोन उचलतात, उचलणे शक्य झाले नाही तर स्वत:हून रिटर्न कॉल करतात, यामुळे मंदाताईंशी घरोबा निर्माण करताना कोणालाही संकोच वाटत नाही.
विजय नाहटा व त्यांचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतपत समर्थक शिंदे गटात सहभागी झाले असले तरी शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता कमीच आहहे. शिवसैनिक आजही मातोश्रीवर निष्ठा दाखवित असल्याने शिंदे गटात जावून आपले राजकारण संपविण्याचा धोका नगरसेवक स्विकारणार नाहीत. शिवसेनेने यापूर्वीही गणेश नाईकांनी शिवसेना सोडल्यावर शून्यातून भरारी मारल्याचे जवळून पाहिले आहे.