नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले असून यावर्षीही श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी पारंपारिक २२ विसर्जन स्थळांव्यतिरिक्त विविध विभागांमध्ये १३४ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात येत आहे. नागरिकांची गर्दी टाळावी व जलप्रदूषणाला प्रतिबंध होऊन इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळांची संख्या मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जाहीर केला असून त्याचे सर्व गणेशोत्सव मंडळांमार्फत स्वागत करण्यात आले आहे. नवी मुंबई महापालिकेने गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी अर्ज करण्यास १४ जुलैपासून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून आत्तापर्यंत १६४ मंडळांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये बेलापूर विभागात २८, नेरुळ विभागात २१, वाशी विभागात १७, तुर्भे विभागात १७, कोपरखैरणे विभागात ३९, घणसोली विभागात ९, ऐरोली विभागात २४ व दिघा विभागात ९ असे १६४ परवानगी अर्ज प्राप्त झाले आहेत. मंडळांच्या सोयीकरिता प्रत्येक विभाग कार्यालयात परवानगीसाठी विशेष कक्ष स्थापित करण्यात आला असून मंडळांना विहित कालावधीत परवानगी मिळावी याची खबरदारी घेतली जात आहे.
मागील वर्षी कृत्रिम तलावामध्ये श्रीमूर्ती विसर्जनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. गतवर्षी एकूण २७८०८ इतक्या विसर्जित श्रीगणेश मूर्तींपैकी कृत्रिम तलावात १४०९० इतक्या मोठ्या संख्येने श्रीमूर्ती विसर्जित करून नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या पर्यावरण विषयक जागरुकतेचा प्रत्यय दिला.
महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये नवी मुंबई हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकित असून यामध्ये जागरुक नवी मुंबईकर नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. हीच जागरुकता कृत्रिम तलावातील श्रीगणेश मूर्ती विसर्जनाला दाखवत जलप्रदूषणाला प्रतिबंधाची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भूमिका नागरिकांनी उचलून धरली.
याशिवाय तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी १४ मुख्य तलावातील जलाशयाच्या साधारणत: ३० टक्के भागात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गॅबियन वॉल उभारण्यात आल्या असून या विशिष्ट क्षेत्रात नागरिकांनी श्रीमूर्ती विसर्जन करावे या आवाहनासही सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सामाजिक आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने मागील २ वर्षांपासून कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने विसर्जन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. यावर्षीही १३४ कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ व अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आल्या असून त्याठिकाणी कृत्रिम तलाव उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे.
यामध्ये बेलापूर विभागात १६, नेरुळ विभागात २५, वाशी विभागात १६, तुर्भे विभागात २०, कोपरखैरणे विभागात १४, घणसोली विभागात १८, ऐरोली विभागात १६ व दिघा विभागात ९ अशाप्रकारे १३४ कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जात आहेत. अशाप्रकारे पारंपारिक २२ व कृत्रिम १३४ अशा १५६ विसर्जन स्थळांवर भावपूर्ण वातावरणात श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. श्रीगणेशोत्सव सुनियोजित पध्दतीने संपन्न व्हावा याकरिता महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून सुयोग्य कार्यवाही करावी तसेच विसर्जन स्थळांवरील सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेले आहेत.
पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी श्रीगणेशोत्सवात सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती ४ फूट व घरगुती श्रीगणेशमूर्तीं २ फूट उंच या मर्यादेत ठेवावी तसेच शक्यतो श्रीमूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे अथवा नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे. पीओपीची मूर्ती असल्यास त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे आणि पर्यावरणशील इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.