नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नामदेव भगत यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक गावडे यांच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी कालावधीला तीन वर्षे पूर्ण झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हा संघटनात्मक बदल करण्यात आला आहे.
नामदेव भगत हे नवी मुंबईच्या राजकारणासोबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुपरिचित असे नाव आहे. गेली साडे तीन दशके नवी मुंबई, ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांनी कार्य केलेले आहे. कॉंग्रेस पक्षातून सामाजिक व राजकीय कार्याचा श्रीगणेशा गिरविल्यावर त्यांनी जवळपास तीन दशके कॉग्रेससाठी कार्य केले होते. युवक तालुकाध्यक्षपासून ते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदापर्यत कॉंग्रेसमध्ये नामदेव भगत यांनी कोणतीही कौंटूबिक पार्श्वभूमी नसतानाही स्वकर्तृत्वावर वाटचाल केली आहे. नवी मुंबई महापालिकेत दुसऱ्या सभागृहापासून ते आतापर्यत नगरसेवक म्हणून कामाचा प्रभावी ठसा उमटवताना विविध समित्यांवर सदस्य म्हणून तसेच नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेता म्हणून नामदेव भगत यांनी उल्लेखनीय काम केले आहे. सिडको महामंडळावर संचालक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवताना नेरूळ येथील आगरी-कोळी भवन, उरण भागातील भूमीपुत्र भवन यासह सिडकोच्या अन्य कामांकडे नामदेव भगत यांच्या कामाची पोचपावती म्हणून पाहिले जात आहे. नामदेव भगत यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूकही लढविलेली आहे.
कॉग्रेसमधील गटबाजीबाजीला कंटाळून नामदेव भगत यांनी नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला. नामदेव भगत यांच्या नेतृत्वाला आणि कर्तृत्वाला शिवसेना पक्षात फारसा वाव मिळालाच नाही. नामदेव भगत हे नेतृत्व वरचढ होणार नाही यासाठी शिवसेनेच्या स्थानिक ते वरिष्ठांनी जाणिवपूर्वक काळजी घेतल्याने नामदेव भगत या नेतृत्वाला गरूडभरारी मारणे जमले नाही. त्यामुळे सव्वा ते दीड वर्षापूर्वी नामदेव भगत यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश घेतला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडी सरकार असताना नामदेव भगत हे कॉंग्र्रेसमध्ये प्रदेश सरचिटणिस म्हणून कार्यरत होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसेपाटील, जितेंद्र आव्हाड यासह अन्य मातब्बर नेत्यांनी नामदेव भगत यांचे कार्य जवळून पाहिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत नामदेव भगत यांनी प्रवेश केल्यावर त्यांच्या साडे तीन दशकातील राजकीय अनुभवाचा पक्षसंघटनेला फायदा व्हावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने नामदेव भगत यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली.
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक बदल करण्यात आले. अशोक गावडे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने नामदेव भगत यांच्यासारख्या जुन्या, जाणत्या, अष्टपैलु, चतुरस्त्र नेतृत्वाच्या हाती नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे.