नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ९६ मध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या किड्यांच्या उपद्रवातून रहीवाशांची सुटका करण्यासाठी तातडीने औषध फवारणी करण्याविषयी संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या संततधार स्वरूपात नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे प्रभाग ९६ मध्ये आरोग्यविषयक नव्याने समस्या निर्माण झालेली आहे. पावसामुळे परिसरात किडे वाढीस लागले आहे. रहीवाशी त्रस्त झाले आहेत. प्रभागामध्ये नेरूळ सेक्टर १८ येथे महापालिकेचे ग्रंथालय व अभ्यासिका आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना व रहीवाशांना किडे चावल्याने शारीरीक व्याधी निर्माण झाल्या आहेत. अंगावर खाज येवून फोड्याही आल्या आहेत. हाताला वेदनाही होत आहे. त्यामुळे या किड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नेरूळ सेक्टर १६,१६ए, १८ परिसरात धुरीकरण करण्याविषयी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.