नवी मुंबई इंटकची महापालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ई.एस.आय.सी सुविधा, आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा देत नाही. प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना पीएफची सुविधा मिळते, मग आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका प्रशासन हात का आखडता घेत आहे, तेच समजत नाही? अशी नाराजी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या वाहन विभागात काम करणाऱ्या वाहन चालकांकडून अपघात झाल्यावर त्या अपघातातवाहन चालकाला जीव गमवावा लागल अथवा कायमचे अपंगत्व आल्यास पालिका प्रशासनाकडून त्यांना सर्वतोपरी आर्थिक मदत तसेच त्याच्या वारसाला नोकरी देणे आवश्यक आहे. याबाबत पालिका प्रशासन काय मदत करणार याविषयी पालिका प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना ईएसआयसीची सुविधा असेल तर शासनाकडून सर्व लाभ भेटतील का याचीही खातरजमा करणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.
महापालिका प्रशासनात जवळपास ५०० हून अधिक कर्मचारी ठोक मनाधनावर कार्यरत आहेत. कायम सेवा आस्थापनेतील कर्मचारी आजारी पडल्यास त्यांच्या आजारपणाचा खर्च पालिका प्रशासन करते. या कर्मचाऱ्यांचे आजारपणात उपचार घ्यावे लागल्याने गैरहजेरी लागल्यासमहापालिका प्रशासन त्यांचे वेतनही कापत नाही. मात्र हाच निकष ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लावला जात नाही. त्या कर्मचाऱ्यांना पदरमोड करून उपचार करून घ्यावे लागतात. तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे आजारपणात गैरहजेरी लागल्यास त्यांचे वेतनही कापले जात असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
गरोदरपणाच्या कालावधीत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याविषयी शासनाचा नियम असताना नवी मुंबई महापालिका प्रशासन गरोदर पणाच्या कालावधीतील वेतन देत नाही. प्रशासनाकडून ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे शोषण करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना सुविधा देण्याकडे प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. काही महिन्यापूर्वी पालिका प्रशासनात काम करणारे एक स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कामावर असताना अपघात झाला. पायाला दुखापत झाल्याने कित्येक दिवस घरी बसून उपचार घ्यावे लागले. घरातील दागिन्यांवर कर्ज काढून औषधोपचाराचा खर्च भागवावा लागला. प्रशासनाने संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्याची फाईल तयार केली व शेवटी फाईलमध्ये ‘असा खर्च देण्याची कसलीही तरतूद नाही’ नमूद करण्यात आले. अशी अनेक उदाहरणे पालिका प्रशासनाला देता येतील . हे कोठेतरी थांबले पाहिजे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय थांबला पाहिजे. या कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून आरोग्य सुविधा मिळण्यासाठी पालिका प्रशासनाने ई एस आय सी सुविधा देण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.