- बॉलीवूडचे प्रख्यात गीतकार, पटकथा लेखक मयूर पुरी यांनी शेअर केले यशाचे रहस्य
नवी मुंबई : राष्ट्रीय फॅशन तंत्रविज्ञान संस्था, एनआयएफटीमध्ये नुकतीच नझम-ए-हसरत ही ऑनलाइन गीत लेखन कार्यशाळा उत्साहात पार पडली. बॉलीवूडचे प्रख्यात गीतकार, पटकथा लेखक मयूर पुरी यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. त्यांनी नर्मविनोदी शैलीत विद्यार्थ्यांशी आपल्या यशाचे रहस्य शेअर केले.
राष्ट्रीय हिंदी दिवसानिमित्त ही नझम-ए-हसरत ही ऑनलाइन गीत लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. एनआयएफटी मुंबईच्या लिटररी क्लब, प्रवाह यांनी काव्यपीडियाच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती. मार्गदर्शक बॉलीवूड गीतकार, पटकथा लेखक मयूर पुरी यांचा गीतलेखन आणि पटकथा लेखन क्षेत्रात दांडगा अनुभव आहे. त्यांनी जवळपास दोन दशके हिंदी फिल्म उद्योगात काम केले आहे. एबीसीडी-२ मधील त्यांची गीते तरुण पिढीच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. गीत लेखनात रुची असणारे हौशी विद्यार्थी तसेच उदयोन्मुख, अनुभवी कलाकारांसाठी त्यांचे अनुभव कथन, शेअरिंग मोलाचे ठरले. या कार्यशाळेत एनआयएफटीचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते. एनआयएफटी मुंबईच्या लिटररी क्लब, प्रवाहने विद्यार्थ्यांसाठी आजवर कॅम्पसमध्ये असे अनेक नवविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या कार्यशाळेत सहभागी भागीदार, काव्यपीडिया, हे भारतीय साहित्याचे ऑनलाइन भांडार आहे. आयुष्मान खुराना आणि राघव जुयाल सारखे दिग्गज त्याचे चाहते आहेत. ते नेहमी अशा कार्यशाळा आयोजित करतात. दीड तासाच्या नझम-ए-हसरत कार्यशाळेत गीतलेखनाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. गीतलेखन हे कथाकथनासारखे कसे आहे, हा नवा मुद्दा मांडला गेला. तथापि, इतर असंख्य पैलूंवरही चर्चा करण्यात आली, ज्यामुळे प्रत्येकाला गीतलेखनाचे सार कळाले.
मयूर पुरी यांनी अनोख्या शैलीत गीत लेखन कसे करावे, त्याचा मंत्र दिला. कशाचीही भीती न बाळगता त्यांनी आपले अनुभव सर्वांशी शेअर केले. जितके मोकळेपणाने तुम्ही समाजात, समूहात वावराल, तितके सहज, नेमकेपणाने अभिव्यक्त होता येईल, हा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एका विद्यार्थ्याने मयूर पुरी यांना दिवसाचे रूटीन कसे असते, असा प्रश्न केला. त्यावर श्री. पुरी यांनी मिश्किलीने सांगितले की, त्यांचा दिवस संध्याकाळी पाच वाजता सुरू होतो. त्यांचे बरेचसे सहकारी दुपारी १२ वाजता उठतात. त्यांचे संगीतकार मित्र आणि सहकारी प्रीतम चक्रवर्ती हेही त्यातलेच एक!
पुरी यांनी त्यांच्या आयुष्यातील काही क्षण मनमोकळेपणे उलगडले. त्यांनी एबीसीडी-२ मधील चुनार हे गाणे लिहिताना त्यांना आलेले अनुभव सांगितले. ते १३ वर्षांचे एकुलते एक मूल म्हणून त्यांच्या आईशी कसे कनेक्ट होत होते, याचे वर्णन केले. संगीतातून शब्द कसे अभिव्यक्त केले जातात, याविषयी सहकारी विद्यार्थ्यांमध्ये एक समज निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. मयूर पुरी यांनी यशस्वीपणे ते पूर्ण केले.