नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन थकविणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे यापुढे ठेका न देण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आदेश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका ही राज्यातील सधन महापालिका असून मोरबेसारखे स्वमालकीचे धरण आणि तिजोरीत अडीच हजार कोटींच्या ठेवी आहेत. परंतु या महापालिकेत काम करणाऱ्या उद्यान विभागातील तब्बल १६८ कामगारांना वेतनासाठी वाशीतील मध्यवर्ती व वर्दळीच्या असणाऱ्या शिवाजी चौकात या कामगारांनी आज भीक मांगो आंदोलन केले आहे. महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी वेतन करण्याचे आदेश देवूनही या कर्मचाऱ्यांना वेतन न देता आदेशाला कचऱ्याची टोपली दाखविणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे व श्रमजिवी, कष्टकरी गरीब कामगारांचे वेतन थकविणाऱ्या ठेकेदारांना कोणत्याही प्रकारचे ठेके देवू नयेत यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देण्यासाठी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विघ्नहर्ता गणरायाचे आगमनही झाले आणि विसर्जनही झाले, परंतु नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे १६८ कर्मचाऱ्यांचे अद्यापि वेतन झालेले नाही. महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्याच्या आदेशाला ठेकेदारांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. यामुळे वेतनासाठी महापालिका प्रशासनाचे व आपणावर ठेकेदारांकडून होत असलेल्या अन्यायाकडे नवी मुंबईकरांचे लक्ष वेधण्यासाठी वाशी सेक्टर १७ मधील छत्रपती शिवाजी चौकात माळी कामगारांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई महानगर पालिकेतील उद्यान विभागातील वाशी, तुर्भे, नेरूळ येथील माळी कामगारांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्यापी ठेकेदारांकडून मिळालेले नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्ट पर्यत महापालिकेतील कायम, ठोक, कंत्राटी तसेच अन्य आस्थापनेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. परंतु आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ठेकेदारांनी आजपर्यत उद्यान विभागातील १६८ माळी कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्याने माळी कामगारांकडून वाशीत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. ऐरोली विभागातील उद्यान कामगारांनी ४ वेळा मुख्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर त्यांचे वेतन दोन दिवसापूर्वी ठेकेदारांकडून करण्यात आले आहे. परंतु इतर विभागातील कामगारांना वेतन दिलेले नाही. स्वमालकीचे धरण आणि तिजोरीत अडीच हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या नवी मुंबईसारख्या श्रीमंत महापालिकेतील उद्यान विभागातील कामगारांवर मासिक वेतनासाठी भिक मांगो आंदोलन करण्याची नामुष्की शुक्रवारी आल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
वाशी विभागातील ७३, नेरुळ विभागातील ६०, तुर्भे विभागातील ३५ माळी कामगार वेतनापासून वंचित आहेत. वाशीच्या कर्मर्चाऱ्यांना एन के शहा इंटरप्रायझेस, नेरूळच्या कर्मचाऱ्यांना जय भवानी इंटरप्रायझेस, तुर्भेतील कर्मचाऱ्यांना डी एम इंटरप्रायझेस या ठेकेदारांकडून वेतन न मिळाल्याने कामगारांनी भीक मांगो आंदोलन केले व या आंदोलनामुळे ठेकेदारांचा मुजोरपणा व पालिका आयुक्तांच्या आदेशाला दाखविण्यात आलेली केराची टोपली या बाबी नवी मुंबईकरांच्या निदर्शनास आल्या. समस्येचे गांभीर्य व कष्टकरी माळी समाजाला वेतनासाठी करावे लागलेले भीक मांगो आंदोलन या पार्श्वभूमीवर ठेकेदारांवर ठोस कारवाई करण्याचे व या एन.के. शहा इंटरप्रायझेस, जय भवानी इंटरप्रायझेस, डी एम इंटरप्रायझेस ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने कोणताही ठेका न देण्याचे आपण नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देवून कामगारांचे शोषण थांबविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.