नवी मुंबई : आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी १९९९ साली स्वाभिमान जपण्यासाठीच राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्मिती केली व राष्ट्रवादी वाढविली. नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार करता बाहेरच्या पक्षातून आयात झालेले नेते होते. दोन प्रभारी, दोन निरीक्षक, एक समन्वयक होते. या ठिकाणी सन्मानाची वागणूक दिली जात नव्हती, मिळतही नव्हती. स्वाभिमानातून निर्माण झालेल्या पक्षात स्वाभिमानाची गळचेपी होत असेल आणि स्वाभिमानालाच तिलांजली दिली असेल तर ती सहन कशी करायची, त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग करत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेध केला असल्याचे स्पष्टीकरण माजी उपमहापौर, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व ज्येष्ठ नगरसेवक अशोक गावडे यांनी दिले.
अशोक गावडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तसेच विजय नाहाटा व विजय चौघुले यांच्या सहकार्याने माजी नगरसेविका सौ. निर्मला गावडे, माजी नगरसेविका अॅड. सपना गावडे –गायकवाड यांच्यासह अजित सावंत (जिल्हा सरचिटणीस), दीपक सिंग (जिल्हा सरचिटणीस), नितीन काहीरे (जिल्हा सरचिटणीस), दीपक शिंदे (वार्ड अध्यक्ष १०९), संतोष भोर (जिल्हा चिटणीस), सुधीर कोळी (जिल्हा उपाध्यक्ष), प्रशांत ठोसर (नेरूळ तालुका कार्याध्यक्ष) , सरिता कांबळे (सामाजिक न्यायसेल अध्यक्ष), चंद्रकांत कांबळे (प्रदेश सरचिटणीस), रवी ढोबळे (सानपाडा तालुकाध्यक्ष), मोहन पाडळे (कोपरखैरणे तालुकाध्यक्ष), हेमंत पाटील (घणसोली तालुकाध्यक्ष), नियाज शेख (तुर्भे तालुकाध्यक्ष), महेश विरदार (रबाळे तालुकाध्यक्ष), अरुण कांबळे ( सी. बी. डी तालुकाध्यक्ष) आदि प्रमुख पदाधिकारी समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अशोक गावडे यांनी शुक्रवारी प्रवेश केल्यावर नेरूळ येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
माझ्याकडे केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा लेबल होता, मला कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. सतत होत असलेली गळचेपी सहन न झाल्याने मला पक्षातून बाहेर पडावे लाहगलरे. २५० ते ३०० कार्यकर्ते सोबतीला होते, अजून नवरात्रीनंतर बरेच जण येतील. पदासाठी आमिषासाठी मी एकनाथ शिंदेसाहेबांकडे प्रवेश केलेला नाही. एक कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला आहे. माझ्या कामाचा आढावा घेवून ते जी जबाबदारी मला देतील, ती स्वीकारणार. शिवसेनेची जी ध्येयधोरणे आहेत, ती स्विकारून जनमाणसाची कामे करणे हाच हेतू आपला हेतू असल्याचे अशोक गावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
अशोक गावडे हे राजकारणातील आणि सहकार क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहे. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय व खंदे समर्थक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून परिचित आहेत. पक्षांतर्गत वादामुळे गावडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली असली तरी एकनाथ शिंदे गटाला नवी मुंबईमधील बेलापुर मतदारसंघात चांगला मातब्बर माणूस उपलब्ध झाला असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.