नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ मध्ये सिडको वसाहतीमधील संभाजीराजे उद्यानासमोरील रस्त्याच्या एका दिशेला गरबा खेळण्याची परवानगी मिळण्याची लेखी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी नेरूळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे एका निवेदनातून केली आहे.
तुटपुंजे पोलिसी संख्याबळ असताना नेरूळसारख्या विस्तिर्ण कार्यक्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गेली अनेक वर्ष नेरूळ पोलिस स्टेशन करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. सध्या राज्य सरकारने सण-समारंभ, उत्सव निर्बंधमुक्त केलेले आहेत. दहीहंडी, गणेशोत्सव उत्सव उत्साहात साजरे झाले. आता नवरात्रौत्सव दहा दिवसावर आले आहेत. कोरोना महामारीमुळे कोणालाही दोन वर्षे सण, उत्सव जाहिररित्या उत्साहात साजरे करणे शक्य झाले आहे. नेरूळ सेक्टर १६ मधील सिडको वसाहतीमधील रहीवाशांनाही नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. त्यांना नेरूळ सेक्टर १६ मधील संभाजीराजे उद्यानासमोरील मार्गावर रस्त्याच्या एका दिशेला रात्रीच्या वेळेस गरबा खेळायची इच्छा असून त्यांनी तशी मागणीही आमच्याकडे केली आहे. नेरूळमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर गरबा खेळला जात आहे. स्थानिक रहीवाशांना गरबा खेळण्याची इच्छा असल्याने आपण त्या ठिकाणी गरबाचे आयोजन करण्यासाठी परवानगी देण्याचा उल्लेख गणेश भगत यांनी निवेदनात केला आहे.
या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या गरबा उत्सवात कायदा व सुव्यवस्थेचे पालन केले जाईल, कोठेही स्थानिक अंतर्गत वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेतली जाईल. गरबा उत्सवात सहभागी होणाऱ्यांना सुरक्षा देण्यात येईल. कोठेही टिंगलटवाळी तसेच छेडछाड प्रकार होणार नाही. स्थानिक सिडको सदनिकांतील रहीवाशी या उत्सवात सहभागी होतील. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे रहीवाशांना उत्सव साजरे करता येतील. आपण या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला गरबा आयोजनासाठी आम्हाला परवानगी देवून स्थानिक जनतेच्या भावनेचा मान राखण्याची विनंती गणेश भगत यांनी केली आहे.
रस्त्यावर गरबा खेळण्यास व मंडप टाकण्यास मनाई असेल तर आम्ही मागत असलेल्या परवानगीच्या ठिकाणापासून काही अंतरावर सेक्टर १८ मधील चौकात शिवसेना पुरस्कृत नवरात्रौत्सवामधील कार्यक्रमांना, दांडीया व गरबाला कशी परवानगी देण्यात येत आहे? आम्ही कोणत्याही राजकीय व्यासपिठावरून नाही तर स्थानिक जनतेच्या आग्रहास्तव सामाजिक संस्थांच्या व्यासपिठावरून परवानगी मागत असताना आम्हाला परवानगी नाकारण्यात येत आहे. एकाला न्याय व दुसऱ्यावर अन्याय ही भूमिका कितपत उचित आहे. त्यामुळे जे न्यायालयीन निर्णय आम्हाला लागू होतात, ते त्यांना लागू होत नाही काय? एकाला परवानगी देणे व दुसऱ्याला नाकारणे योग्य नसल्याने आमच्या परवानगी अर्जाचा विचार करून आपण आम्हाला परवानगी द्यावी अथवा आमच्या परिसरात कोणालाच रस्त्यावर गरबा खेळण्यास परवानगी देवू नये. रस्त्यावर राजरोसपणे त्या ठिकाणी गरबा, दांडिया खेळले जात असताना त्यांच्या कारवाई होत नाही. न्यायालयाचे निर्णय त्यांना लागू होत नाही काय? याही बाबीचा लेखी खुलासा देण्याची मागणी गणेश भगत यांनी निवेदनातून केली आहे.