नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर सहा व चार मधील चौकात होणाऱ्या वाहतुक कोंडीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी स्थानिक वाहतुक पोलिसांना आदेश देण्याची लेखी मागणी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी वाहतुक विभागाच्या गायमुख पोलिस चौकीच्या वरिष्ट पोलिस निरीक्षकांकडे एका निवेदनातून केली आहे.
या समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी रविंद्र सावंत यांनी निवेदन सादर करताना निवेदनातून आपणास गांभीर्याची तीव्रता समजणार नाही. आपण सांयकाळपासून ते रात्री उशिरापर्यत तसेच दुपारच्या वेळीही तिथे थांबून राहील्यास समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल आणि अनुभवयासही मिळेल असे म्हटले आहे.
नेरूळ सेक्टर सहा व चारच्या मध्ये चौक आहे. या चौकात वाहनांची वर्दळ नेहमीच असते. सेक्टर सहामधील व सेक्टर चारमधील वाहने पामबीच मार्गाकडे जाण्यासाठी अथवा राजीव गांधी उड्डाण पुलाकडे जाण्यासाठी याच चौकात येतात. या चौकापासून हाकेच्याच अंतरावर असलेल्या पामबीच मार्गाकडून नेरूळमध्ये येणारी वाहने सेक्टर २,४,६,१६,१८,२०,२४ सेक्टरकडे जाण्यासाठी या चौकातूनच ये-जा करतात. या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून वाहतुक कोंडीची समस्या होती. परंतु आता या समस्येचा भस्मासूर झालेला आहे. या चौकातून वाहने बाहेर काढण्यासाठी २० ते ३५ मिनिटे लागतात. यादरम्यान कोणी रूग्णवाहिकेत सिरीयस असलेला रूग्ण उपचाराअभावी दगावण्याची भीती आहे. कोठे दुर्घटना घडल्यास अग्निशमनच्या वाहनांना घटनास्थळी लवकर जाता येत नसल्याचे निवेदनातून रविंद्र सावंत समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
या चौकालगतच मोठमोठी हॉटेल, टायर विक्रीची दुकाने आहेत. हॉटेलचालकांनी, टायर दुकानवाल्यांनी मार्जिनल स्पेसवर पूर्णपणे अतिक्रमण केल्याने हॉटेलमध्ये येणाऱ्यांची वाहने रस्त्यावर कोठेही उभी असतात. नो पार्किंगचे फलक नामधारी झाले असून फलकासमोरच वाहने उभी असतात. या हॉटेलांच्या विरूध्द दिशेलाच वाहतुक पोलीस असतानाही या वाहनांवर कारवाई केली जात नाही. टायरविक्रेत्यांने मार्जिनल स्पेसमध्ये टायर बदलण्यासाठी आलेली वाहने उभी केल्यास तेथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यातून पादचारी व वाहनचालकांची दररोज भांडणे होवून गर्दी जमा होवून वाहतुक कोंडी वाढते.
या ठिकाणच्या वाहतुक कोंडीवर महापालिका व वाहतुक पोलिसांनी सातत्याने कारवाई करून तोडगा काढणे आवश्यक आहे. या चौकालगत हॉर्टचे हॉस्पिटल आहे. वाहनांची गर्दी झाल्यावर हॉर्नच्या सतत आवाजामुळे रूग्णही त्रस्त झाले आहेत. येथील मार्जिनल स्पेसवर विळखा घालणारे टायरविक्रेते, हॉटेलचालक यांच्यावर दररोज महापालिकेने कारवाई केल्यास पादचाऱ्यांना ये-जा करण्यास कोणताही अडथळा येणार नाही. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर टोईग लावून वाहतूक पोलिसांनी सतत कारवाई केल्यास दंडामुळे येथे कोणी वाहने उभी करणार नाही. वाहतुक कोंडीची समस्या निकाली निघेल. या चौकातील वाहतुक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन व वाहतुक पोलिसांनी संयुक्तपणे सातत्याने कारवाई करावी. समस्येमुळे वाहनचालक व पादचारी तसेच सभोवतालच्या इमारतीमधील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. हॉर्नचा आवाज व धुराचा त्रास स्थानिकांना नाहक सहन करावा लागत आहे. आपण या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी संबंधितांना आदेश देवून वाहनचालकांना, पादचाऱ्यांना आणि स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.