नवी मुंबई : महापालिकेत काम करणाऱ्या कायम सेवेतील सर्वच अधिकारी-कर्मचारी तसेच ठोक मानधनावर तसेच कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण यादी विभागस्तरावर महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्याची लेखी मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिकेत कायम सेवेतील कर्मचारी, अधिकारी, ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी वर्षांनुवर्षे कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वास्तव्य करणाऱ्या नवी मुंबईकरांना नागरी समस्या सोडविण्यासाठी, असुविधा दूर करण्यासाठी तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी पालिका प्रशासनाशी संपर्क करण्याची गरज भासते. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कार्यालयीन वेळेत जावे लागत असल्याने महापालिकेच्या विभाग कार्यालयात अथवा महापालिका मुख्यालयात येवून तक्रार करणे त्यांना शक्य होत नाही. अनेकदा नवी मुंबईकरांनी आपणाकडे अथवा विभाग कार्यालयात मेलवर लेखी निवेदनाचा रतीब टाकूनही दखल घेतली जात नसल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
महापालिका प्रशासनाने महापालिकेतील कायम सेवेतील कर्मचारी, अधिकारी, ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी यांची यादी संपर्क क्रमाकांसहीत व खातेनिहाय संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यास आपल्या त्या त्या विभागाच्या समस्यांसाठी संबंधितांशी संपर्क साधणे नवी मुंबईकरांना सहजशक्य होईल. आज समस्या सोडविण्यासाठी करदात्या नवी मुंबईकरांना राजकारण्यांच्या निवासस्थानी अथवा कार्यालयात चकरा माराव्या लागतात. अशा वेळी जनतेची कामे करणाऱ्या राजकारण्यांनी एकप्रकारे केलेल्या कामाच्या उपकाराच्या ओझ्याखाली वावरावे लागते. नवी मुंबईकर पालिका प्रशासनाला कर भरतात. या करातून महापालिका नवी मुंबईत विकासकामे करते, समस्या सोडविते. महापालिका कर्मचारी व अधिकारी यांचे वेतनही याच कराच्या जमा केलेल्या पैशातून होत असते. त्यामुळे हे चित्र कोठेतरी थांबले पाहिजे, यासाठी सकारात्मक प्रतिसादाची गरज आहे. नवी मुंबईकर व संबंधित खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये समस्या निवारणासाठी विभागनिहाय व खातेनिहाय पालिकेच्या संकेतस्थळावर कर्मचारी – अधिकारी यादी उपलब्ध झाल्यास नवी मुंबईकरांना पालिका प्रशासनाशी थेट संपर्क साधणे शक्य होईल व करदात्या नवी मुंबईकरांना राजकारण्यांच्या घरचे अथवा कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळही येणार नाही. समस्येचे गांभीर्य व नवी मुंबईकरांची मागणी लक्षात घेता आपण संबंधितांना लवकरात लवकर निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.