नवी मुंबई : नेरूळ पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणावर लागलेल्या अनधिकृत होर्डींग व बॅनरवर तातडीने कारवाई करून बाहेरील व अंर्तगत भागात आलेला बकालपणा घालविण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.
नेरूळ पश्चिमेला सर्वच प्रभागात अंर्तगत व बाह्य रस्त्यावर, नाक्यावर, चौकाचौकात, बसेडेपो परिसर, रस्ते फेरफटका मारल्यास सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर व होर्डिग लागलेले दिसून येतील. यामुळे नेरूळ पश्चिम परिसराला मोठ्या प्रमाणावर बकालपणा आला असून पालिका प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बॅनर व होर्डीग लावणाऱ्यांनी पथदिव्यावरही अतिक्रमण केले आहे. पालिकेचा महसूल बुडत असतानाही अतिक्रमण विभाग या अनधिकृत बॅनर व होर्डगवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याची नाराजी संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
गेली अनेक महिने अनधिकृत बॅनर व होर्डीगबाबत संदीप खांडगेपाटील सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून पालिका प्रशासन कारवाई न करता या बॅनरला खतपाणी घालत आहे. तातडीने नेरूळ पश्चिम परिसरातील सर्वच प्रभागात अंर्तगत व बाह्य भागात लागलेले अनधिकृत होर्डीग व बॅनर काढण्यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश द्यावेत आणि अनधिकृत बॅनर तसेच होर्डींग लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, जेणेकरून अनधिकृत बॅनर व होर्डींग लावण्याचे धाडस कोणी करणार नाही. अनधिकृत बॅनर व होर्डींग तातडीने हटवून नेरूळ पश्चिमेला आलेला बकालपणा संपुष्ठात आणावा अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.